पालघर जिल्ह्यात वसई तालुक्यात सर्वाधिक ६०.५० मिमी पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2020 12:52 AM2020-08-13T00:52:50+5:302020-08-13T00:52:58+5:30
विश्रांतीनंतर पुन्हा मुसळधार : अनेक भागांमध्ये साचले पाणी
विरार : आठवडाभर विश्रांती घेतलेल्या पावसाने मंगळवारपासून वसईत पुन्हा जोर धरला आहे. मंगळवारी सकाळी ७ ते बुधवारी सकाळी ५ वाजेपर्यंत वसई तालुक्यात ६०.५० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. बुधवारीही पावसाने कोसळधार कायम ठेवल्यामुळे वसईतील सखल भागात पाणी साचले होते. पाऊस आणि त्यासोबत जोरदार वारेही वाहत होते. त्यामुळे वसई-विरारमध्ये वाहतुकीची गती मंदावली होती. काही तासांत पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
दुपारी दीड वाजल्यानंतर वसईमध्ये पावसाने चांगला जोर धरला होता. सकाळपासून रिपरिप पडत असलेल्या पावसाने सकाळी ११ वाजल्यानंतर मुसळधार हजेरी लावली. त्यानंतर, दुपारनंतर पुन्हा पावसाने वसईकरांना झोडपून काढले. या पावसामुळे काही ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले होते. तर, वसई पूर्वेतील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक-८ वर पाणी साचले होते.