चारोटी येथे महामार्गावर पुलावरून कार नदीत पडली, दोन ठार, तीन गंभीर जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2018 10:15 PM2018-07-10T22:15:30+5:302018-07-10T22:15:36+5:30
डहाणू तालुक्यातील चारोटीजवळ महामार्गावर चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने गाडी नदीत पडून झालेल्या अपघातात दोन ठार तर तीन गंभीर जखमी झाले.
- शशिकांत ठाकूर
कासा- डहाणू तालुक्यातील चारोटीजवळ महामार्गावर चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने गाडी नदीत पडून झालेल्या अपघातात दोन ठार तर तीन गंभीर जखमी झाले असून जखमीवर कासा उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे. गुजरातकडून मुंबईकडे जाणाऱ्या कार चारोटी येथील गुलजारी नदीवरील पुलाच्या संरक्षक कठडाला आढळून दोन पुलाच्या मध्ये गाडी नदीत कोसळली. त्यामध्ये गाडी खोल दगडावर जाऊन पडली असता गाडीचा चक्काचूर झाला. मात्र कासा पोलीस व नागरिकांनी तात्काळ मदतकार्य केल्याने गाडीतील सर्व जखमींना कासा उप जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
उपचारादरम्यान ओमप्रकाश चंद्रिका दुबे (वय 45) व रोहित दुबे( वय 40) दोघेही राहणार सांताक्रूझ हे मृत झाले असून, सुनील कांता पांडे (वय 46) रा भाईंदर, दयाशंकर राजेंद्र शेठ (वय 32) रा. भाईंदर, संदीप राजेंद्र प्रसाद उपाध्याय (वय 38 )रा. नालासोपारा हे गंभीर जखमी झाले असून, कासा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघातात गाडी नदीत कोसळली, परंतु दुपारनंतर पाऊस कमी झाल्याने पूर ओसरला होता, अन्यथा गाडी पुरात वाहून गेली असती. दरम्यान गाडीवर प्रेस लिहिले आहेत, त्यामुळे संबंधित व्यक्ती पैकी कोणी पत्रकार असण्याची शक्यता आहे.