महामार्गावर रॉबरीचा बनाव करणाऱ्या त्रिकुटाला अटक; वालीवच्या गुन्हे प्रकटिकरण शाखेची कामगिरी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2023 04:10 PM2023-09-20T16:10:32+5:302023-09-20T16:10:40+5:30

वरिष्ठांचे परवानगीने गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अधिकारी व अंमलदार यांचे पथक राजस्थान येथे पाठवले.

Highway robbery trio arrested; | महामार्गावर रॉबरीचा बनाव करणाऱ्या त्रिकुटाला अटक; वालीवच्या गुन्हे प्रकटिकरण शाखेची कामगिरी

महामार्गावर रॉबरीचा बनाव करणाऱ्या त्रिकुटाला अटक; वालीवच्या गुन्हे प्रकटिकरण शाखेची कामगिरी

googlenewsNext

नालासोपारा (मंगेश कराळे) : मुंबई अहमदाबाद महामार्गावर रॉबरी झाल्याचा बनाव करत मालकाची फसवणूक करणाऱ्या त्रिकुटाला (तीन सख्या भावांना) वालीवच्या गुन्हे प्रकटिकरण पथकातील पोलिसांनी अटक केल्याची माहिती जनसंपर्क अधिकारी प्रवीण बनगोसावी यांनी बुधवारी दिली आहे.

नवी मुंबई येथे राहणारे व काम करत असलेल्या कंपनीतील खाद्य तेलाच्या बिलाचे पैसे गोळा करणारे महेंद्र देवाराम गुजर (३५) हे ९ सप्टेंबरला रात्री दहाच्या सुमारास महामार्गावरील सातीवली फाटा येथून दुचाकीवरून जात असताना दोन दुचाकीवरुन आलेल्या चार जणांनी त्यांना रस्त्यात थांबवत दमदाटी केली. त्यानंतर त्यांच्याकडील बॅग हिसकावून घेऊन ते पळून गेले होते. पळवून नेलेल्या बॅगेत ३ लाख रुपयांची रोख रक्कम होती. याप्रकरणी वालीव पोलिसांनी जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला होता. महेंद्र गुजरकडे तपासादरम्यान चौकशी करताना तपासात काही एक सहकार्य न करता वेळोवेळी खोटी माहीती देत होते. दरम्यान त्यांनी त्यांचा मोबाईल फोन बंद केला. त्यामुळे त्याच्यावर संशय बळावल्याने तांत्रिक विश्लेषणाचे आधारे माहिती प्राप्त करून महेंद्र गुजर हे त्यांचे मुळ गावी राजस्थान येथे गेले असल्याचे दिसुन आले.

वरिष्ठांचे परवानगीने गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अधिकारी व अंमलदार यांचे पथक राजस्थान येथे पाठवले. पथकाने त्यांना गुन्हयाचे अधिक चौकशीकामी ताब्यात घेऊन वालीव पोलीस ठाण्यात आणून चौकशी केली. चौकशी दरम्यान त्यांनी व त्यांचे दोन भावांनी आपसात संगणमत करुन कट रचुन जबरी चोरीचा खोटा बनाव केल्याचे तपासात निष्पन्न झाले. यातील आरोपी महेंद्र देवाराम गुर्जर (३५), रामलाल देवाराम गुर्जर (२८) आणि शैतानराम देवाराम गुर्जर (३८) यांना अटक करुन त्यांचेकडुन गुन्हयातील अपहार केलेली रक्कम जप्त करण्यात आलेली आहे. 

वरील कामगिरी पोलीस उपायुक्त पौर्णिमा चौघुले-श्रींगी, सहाय्यक पोलीस आयुक्त विनायक नरळे, वालीवचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयराज रणवरे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) जिलानी सय्यद यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटिकरण शाखेचे  सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन सानप, पोलीस हवालदार मुकेश पवार, मनोज मोरे, किरण म्हात्रे, सचिन दोरकर, सतीश गांगुर्डे, बाळु कुटे, विनायक राऊत, अभिजीत गढरी यांनी केली आहे.

Web Title: Highway robbery trio arrested;

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.