मद्यपान करून तीन महिन्यांत दोन वेळा ‘हिट अँड रन’; आरोपीवर गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2024 08:43 AM2024-10-04T08:43:04+5:302024-10-04T08:43:21+5:30

गुन्हा दाखल करून पोलिसांनी आरोपीला नोटीस बजावून सोडून दिले, मात्र यातून कोणताही धडा न घेता याच आरोपीने बुधवारी रात्री पालघर-मनोर मार्गावर पुन्हा एका दुचाकीचालकास फरफटत नेल्याची घटना उघडकीस आली आहे. 

'Hit and run' two times in three months after drinking; Crime against the accused | मद्यपान करून तीन महिन्यांत दोन वेळा ‘हिट अँड रन’; आरोपीवर गुन्हा

मद्यपान करून तीन महिन्यांत दोन वेळा ‘हिट अँड रन’; आरोपीवर गुन्हा

लोकमत न्यूज नेटवर्क
पालघर : शिरगाव येथे मैत्रिणीसोबत बसून दारू पिऊन सातपाटीकडे जीपने जाताना एकाने पाच ते सात वाहनांना कट मारला. याचा जाब विचारणाऱ्याच्याच अंगावर गाडी घालून बेदरकार चालकाने त्याची मोटारसायकल १५-२० फूट लांब फरफटत नेली. याप्रकरणी गुन्हा दाखल करून पोलिसांनी आरोपीला नोटीस बजावून सोडून दिले, मात्र यातून कोणताही धडा न घेता याच आरोपीने बुधवारी रात्री पालघर-मनोर मार्गावर पुन्हा एका दुचाकीचालकास फरफटत नेल्याची घटना उघडकीस आली आहे. 

 याप्रकरणी प्रियेश प्रवीण परमार याच्यावर मनोर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. आरोपी पालघरमधील बिडकोच्या निरलॉन कंपनी मालक असून, त्याच्या गाडीत दारूच्या बाटल्या सापडल्या आहेत.

दुचाकीचालकांना कट मारून काढला पळ 
    सातपाटी-शिरगाव रस्त्यावर दारू पिऊन बेदरकारपणे गाडी चालवून पाच ते सात वाहनांना कट मारणाऱ्यास फिर्यादी अमेय चौधरी यांनी सातपाटी येथे अडवून त्याच्या गाडीसमोर दुचाकी लावून त्याला जाब विचारला. 
    यावेळी त्याच्या अंगावर गाडी घालणाऱ्या प्रियेश प्रवीण परमारवर सातपाटी सागरी पोलिस ठाण्यात २० जुलैला गुन्हा दाखल झाला, मात्र त्याला समज देऊन सोडण्यात आले. याप्रकरणी पोलिस अधीक्षकांकडे तक्रार केली होती.
    तीन महिन्यांनी आरोपीने पुन्हा दुचाकीचालकाला धडक देऊन त्याला फरफट नेले. अपघातानंतर दोन-तीन दुचाकीचालकांना कट मारून तो पळून गेला. स्थानिकांनी आरोपीच्या गाडीचा पाठलाग करून त्याला पकडले. निसार खान याच्या तक्रारीवरून कारवाई झाली.

परवाना रद्द होणार?
बेदरकारपणे गाडी चालवणे, नुकसान पोहोचविण्याच्या प्रयत्न करणे, आदी कलमान्वये आरोपीवर गुन्हा दाखल झाला आहे. दारू पिऊन गाडी चालवून लोकांच्या जीविताला धोका निर्माण करण्याचा प्रकार दुसऱ्यांदा घडल्याने आरोपीचा वाहन परवाना रद्द करणे आणि वाहन जप्त करणे याबाबत आरटीओकडे पत्रव्यवहारही करण्यात आला आहे.

Web Title: 'Hit and run' two times in three months after drinking; Crime against the accused

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Accidentअपघात