होळी, धुळवडीवर पोलिसांची करडी नजर
By Admin | Published: March 12, 2017 02:09 AM2017-03-12T02:09:44+5:302017-03-12T02:09:44+5:30
होळी-रंगपंचमीच्या दिवसात मुलींची छेडछाड, दारु पिऊन धिंगाणा, बळजबरीने पोस्त मागणे अशा प्रकारांमुळे अनुचित प्रकार घडण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलिसांनी खास खबरदारी
वसई : होळी-रंगपंचमीच्या दिवसात मुलींची छेडछाड, दारु पिऊन धिंगाणा, बळजबरीने पोस्त मागणे अशा प्रकारांमुळे अनुचित प्रकार घडण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलिसांनी खास खबरदारी घेतली आहे. दोन दिवस पोलिसांची करडी नजर असणार असून गैैरप्रकार करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे. डीजे लावणे, फुगे फेकणे, पोस्त (वर्गणी) मागणे यावर बंदी घालण्यात आली असून १३ मार्चपर्यंत जिल्ह्यात मनाई आदेशही लागू करण्यात आला आहे.
होळी आणि रंगपंचमीचा सण लक्षात घेऊन जिल्ह्यात ठिकठिकाणी गस्त वाढवून नाकाबंदी सुरु केली आहे. होळी आणि रंगपंचमीच्या दिवशी गैरप्रकार होऊन हाणामारीचे प्रकार घडण्याची शक्यता असते. त्यासाठी जिल्ह्याभर पोलीस यंत्रण सतर्क झाली आहे. प्रत्येक पोलीस ठाण्यातून नागरीकांना सण शांततेत साजरे करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर रंगाचा बेरंग करणाऱ्यांवर कडक कारवाईचा इशाराही देण्यात आला आहे.
सध्या दहावी बारावीच्या परिक्षा सुरु असल्याने नागरीकांनी डीजे लावून धांगडधिंगा करू नये असे आवाहन करण्यात आले आहे. विद्यार्थी अभ्यासात गुंतले असल्याने त्यांना त्रास होईल असा डीजे लावण्यात आल्यास कडक कारवाई केली जाणार आहे. मुलींची छेडछाड, दारु पिऊन आपापसात वाद होऊन भांडणे, रस्त्यावर उभे राहून पोस्त मागणे यावर पोलिसांची करडी नजर असणार आहे. पाण्याने भरलेले फुगे आणि पिशव्या यामुळे एखाद्याला इजा पोचून, कायमचे अपंगत्व येण्याचा धोका असतो. त्यामुळे फुग्यांचा वापर टाळण्यात यावा असे आवाहन करणाऱ्या पोलिसांनी अशा लोकांवर कडक कारवाई केली जाईल, असा इशाराही दिला आहे.
त्यासाठी जादा पोलीस बळ तैनात करण्यात आले आहे. रंगपंचमीच्या दिवशी समुद्रकिनारी मोठी गर्दी होत असल्याने त्याठिकाणी अनुचित प्रकार घडण्याची शक्यता असल्याने समुद्रकिनाऱ्यावर पोलिसांचे विशेष लक्ष असणार आहे.
लादलेत अनेक निर्बंध
शक्यतो नैैसर्गिक रंग वापरावेत. चांगल्या प्रतीचे रंग वापरावेत. ओळखीच्या व्यक्तीलाच रंग लावण्यात यावा. अनोळखी व्यक्ती आणि महिलांना जबरदस्तीने रंग लावू नये. दारु पिऊन गाड्या चालवू नयेत. रस्त्यावर दारु पिऊन धिंगाणा घालू नये. असे आवाहन पोलिसांनी केले आहे. होळी आणि रंगपंचमीचा सण शांततेत साजरा व्हावा यासाठी पोलिसांनी जिल्हयात मनाई हुकुम जारी केला आहे.