वसईतील बेघर परप्रांतीयांचा जंगलात आसरा; श्रमिक ट्रेनमध्ये नंबर लागत नाही
By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2020 11:35 PM2020-05-29T23:35:26+5:302020-05-29T23:35:36+5:30
वसईतील बेघर परप्रांतीयांचा जंगलात आसरा; श्रमिक ट्रेनमध्ये नंबर लागत नाही :
- प्रतीक ठाकूर
विरार : हाताला काम नाही, भाडे भरण्यास पैसे नसल्याने घर रिकामे करावे लागले. गावाला जायचे तर श्रमिक ट्रेनमध्ये नंबर लागत नाही. अशा अनेक संकटात सापडलेल्या मजुरांवर आता परिवारासह जंगलात राहण्याची वेळ आली आहे. नालासोपारा येथील संतोष भुवनच्या जंगलातील डोंगरावर अशा प्रकारे सध्या काही मजूर राहात आहेत.
उत्तर प्रदेशातील सुलतानपूर येथे जाण्यास निघालेले सद्दाम अन्सारी आणि त्यांचे कुटुंबीय मंगळवारी वसईतील एव्हरशाईन येथे पोहोचले. पण इतरांप्रमाणेच त्यांच्याही पदरी निराशा आली. सकाळी ६.३० पासून वाट पाहात थांबल्यानंतर अखेर दुपारी ३.३० वाजता त्यांना येथून कोणतीही गाडी सुटणार नाही, असे सांगण्यात आले. तसा अन्सारी कुटुंबीयांनी पुन्हा नालासोपारा येथील घरचा रस्ता धरला. पण भाड्याचे पैसे न भरल्याने घरमालकाने त्यांना तेथे राहण्यास मज्जाव केला. अखेर त्यांनी जंगलात आसरा घेतला.
सद्दाम यांच्याप्रमाणेच इतर शेकडो लोक डोंगरावर झोपड्या बांधून राहात आहेत. लॉकडाउनच्या काळात कोणी न कोणी आम्हाला जेवण देत होते. नंतर तेही बंद झाले. गावाहून मागवलेले पैसेही आता संपले आहेत, असे त्यांनी सांगितले. नालासोपारा येथील पेल्हार येथे राहणारा विकास सिंह आठवडा बाजारात कपडे विकून आपला उदरनिर्वाह करतो. त्याच्या कुटुंबात तीन सदस्य आहेत.
लॉकडाउन सुरू झाले तेव्हा त्याच्याकडे केवळ पाच हजार रुपये होते. याच ठिकाणी तो दोन हजार रुपये भाडे देऊन राहात होता. आता ते पैसेही संपले आहेत. गावाला जायचे आहे तर गाड्यांची सोय नाही. ट्रॅव्हल्सवाले ३-४ हजार रुपये मागतात. अखेर हतबल होऊन डोंगरावर झोपडी बांधून राहात असल्याचे विकास यांनी सांगितले.
एजंटकडूनही फसवणूक
अमित दुबे हा तरुण वसईतील एका कंपनीत काम करून तेथेच राहात होता. लॉकडाउननंतर मालकांनी एक महिना सांभाळ केला. नंतर पाच हजार देऊन गावाला जाण्यास सांगितले. त्यातील तीन हजार अमितने एका एजंटला दिले.
तो गावाला जाण्यासाठी पोलिसांकडून ट्रेनचा पास मिळवून देणार होता. यासाठी त्याच्याकडून फॉर्म भरून घेतला. पास कन्फर्म झाला की, आपल्याला मेसेज येईल, असे सांगितले. आता तो एजंटही टाळाटाळ करत आहे आणि उरलेले पैसेही संपल्याने अमितनेही आता डोंगरावर आश्रय घेतला आहे.