शिक्षक दिन : समाजातील मानाचे स्थान शिक्षकांच्या संस्कारांमुळेच
By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2019 12:17 AM2019-09-05T00:17:37+5:302019-09-05T00:17:43+5:30
आयटी क्षेत्र ते भारतीय प्रशासकीय सेवा असा प्रवास करणारे स. जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांना घडवणारे शिक्षक कोण?
डहाणू/बोर्डी : भौतिकशास्त्राच्या शिक्षकाचे प्रभावी व्यक्तिमत्व आणि अध्यापन शैलीमुळे ते आवडू लागले. त्यामुळेच पुढे या विषयाची गोडी निर्माण होऊन आयटी क्षेत्राकडे ओढलो गेलो. तेथे गणित हा विषय आवडू लागला. त्यानंतर इंडियन सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये भवितव्य घडविण्याच्या स्वप्नांची बीजे रोवली गेली. हा अभ्यासक्रम पूर्ण करून आयएएस परीक्षेची तयारी केली. त्यामध्ये यश मिळाले. आज समाजात आणि माझ्या शाळेत मला मानाचे स्थान मिळाले आहे. त्याचे एकमेव कारण म्हणजेच शिक्षकांनी दिलेली शिकवण हेच आहे, असे डहाणूचे प्रांत अधिकारी सौरभ कटियार यांना वाटते. एका सामान्य घरातून आयएएस होण्याचं स्वप्न साकारलं ते केवळ शिक्षकांमुळेच!
उच्च शिक्षणाचे सर्व श्रेय शिक्षकांचेच
लखनौ येथे शालेय तर कानपूरला आयटी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. अभ्यासाव्यतिरिक्त राबविल्या जाणाऱ्या उपक्र मांमध्ये सहभाग घेऊन अष्टपैलू व्यक्तिमत्त्व घडले जाते. त्यामुळेच विविध आव्हानं सक्षमपणे पेलली जाऊ शकतात, ही महत्त्वपूर्ण शिकवण महाविद्यालयातील शिक्षकांमुळे आत्मसात करता आली. तर घरापासून लांब वसतिगृहातील अनुभव हा खºयाअर्थी जीवनानुभव ठरला.
मी लखनौ पब्लिक स्कूल मधून पहिली ते बारावी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. शालेय जीवनात मला सलब नावाच्या शिक्षकांनी प्रभावित केले. त्यांचे व्यक्तिमत्त्व आणि अध्यापनाची पद्धत खूपच वेगळी होती. भौतिकशास्त्रासारखा कठीण विषय त्यामुळे आवडू लागला. ही केवळ माझी एकट्याची नव्हे तर सहअध्यायी असलेल्यांचीही भावना होती. विद्यार्थ्यांनी जास्तीत-जास्त प्रश्न विचारले पाहिजेत, त्यांचे निरसन करण्याकरिता शाळा सुटल्यानंतरचा वेळही ते विद्यार्थ्यांना द्यायचे.
अनौपचारिक शिक्षणाच्या ज्ञानातून केले समृद्ध
पाठ्यपुस्तकातील विषयांसह जीवनातील विविध प्रसंगातून त्यांनी अनौपचारिक शिक्षणाचे ज्ञान देऊन समृद्ध केले. शाळेत शिक्षकांबरोबर असणारे संबंध आणि कॉलेज जीवनातील वातावरणात जाणवणारा मोकळेपणा या संवादातून आज प्रत्यक्ष काम करताना जी गुंतागुंतीची गणिते उभी राहतात, त्यांची सोडवणूक करताना ती शिदोरी उपयोगी ठरते आहे. विद्यार्थ्यांनी केवळ अभ्यास एके अभ्यास असे न वागता सर्व उपक्र मात सहभागी होण्याचे महत्त्व ते अधोरेखित करतात.
वसतीगृहात शिकत असताना तेथे दिले जाणारे जेवण निकृष्ट दर्जाचे होते. यावेळी विद्यार्थ्यांनी एकत्रित येऊन याविरु द्ध आवाज उठविण्याचे ठरविले. त्यानंतर कॉलेजात मोर्चा काढण्याचे ठरविले. अन्य विद्यार्थ्यांसह त्यामध्ये सहभागी झालो. त्याची दखल कॉलेज प्रशासनाने घेतली आणि आमची मागणी पूर्ण झाल्यानंतर चांगल्या दर्जाचे जेवण मिळू लागले. सर्वसामान्य घरातून आलेल्या सौरभ यांनी २०१६ मध्ये प्रशासकीय सेवेत यश संपादन केले, त्यात कुटुंबियांप्रमाणेच शिक्षकांचा मोठा वाटा आहे. आजही जेव्हा वेळ मिळतो तेव्हा शाळेत जाऊन शिक्षकांना भेटतो. ते क्षण खूप आनंदी असतात. आज मृदुल सर हयात नाहीत, त्यांच्या आठवणीने डोळे पाणावतात. या सर्वांच्या आठवणींशिवाय आयुष्याचे वर्तुळ पूर्णत्वास येऊ शकत नाही.
कॉलेजात मागण्यांकरिता काढला होता मोर्चा