वाड्यातील होरबिगर कंपनी व्यवस्थापन नमले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2021 01:27 AM2021-02-12T01:27:24+5:302021-02-12T01:27:31+5:30
उपोषणकर्त्या कामगारांच्या सर्व मागण्या मान्य : मान्यवरांच्या हस्ते उपोषण समाप्त
वाडा : तालुक्यातील वडवली- मुसारणे ग्रामपंचायत हद्दीतील होरबिगर इंडिया प्रेसिजन कंपनी कामगारांनी आपल्या विविध मागण्यांसंदर्भात सोमवारपासून कंपनी प्रवेशद्वारासमोर आमरण उपोषण सुरू केले होते. याबाबत तिसऱ्या दिवशी कंपनी व्यवस्थापनाने नरमाईची भूमिका घेऊन अखेर उपोषणकर्त्या कामगारांच्या सर्व मागण्या मान्य केल्या आहेत.
निलंबित केलेल्या कामगारांना तत्काल कोर्टाच्या आदेशान्वये कामावर घेण्यात येईल, विनाकारण कोणत्याही प्रकारचा पत्रव्यवहार व लेटरबाजी केली जाणार नाही. कामगारांचा मानसिक व शारीरिक छळ कधी केला जात नाही, यापुढेही केला जाणार नाही. कंपनी बंद केली जाणार नाही, प्रासंगिक पत्रव्यवहार उभयपक्षी स्वीकारला जाईल. कंपनीतील चालू स्थितीतील मशीन बाहेर नेल्या जाणार नाहीत, बंद स्थितीतील मशीन बाहेर नेताना युनियनशी चर्चा केली जाईल. कामगारांना भविष्य निर्वाह निधी नियमानुसार व कायदेशीर दिला जाईल. कंपनी मालकी हक्क व स्थलांतराबाबत आगाऊ माहिती देण्यात येईल, कामगारांशी चर्चा करून प्रश्न सोडविले जातील आदी मागण्या मान्य केल्या. तहसीलदार डाॅ. उद्धव कदम, कामगार आयुक्त किशोर दहिफळकर, सहायक कामगार आयुक्त संकेत कानडे, पोलीस निरीक्षक सुधीर संखे, भाजपचे ज्येष्ठ नेते बाबाजी काठोळे, प्रशांत पाटील, कंपनी मॅनेजर संतोष देशमुख यांच्या यशस्वी मध्यस्थीनंतर लेखी आश्वासन देण्यात आले. मयूर लबडे, रुपेश पाटील, नवनाथ मोर, भक्तिदास भोईर, दीक्षा पाटील आदी उपोषणास बसले होते. व्यवस्थापनाकडून दिलेल्या लेखी आश्वासनानंतर कामगारांनी समाधान व्यक्त केले आहे.