नुकसान भरपाईसाठी बागायतदार संघटित

By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2019 12:55 AM2019-12-11T00:55:26+5:302019-12-11T00:55:53+5:30

अवकाळीमुळे पालघर जिल्ह्यातील चिकू फळाचे आतोनात नुकसान : प्रश्न सोडवण्याचे आमदारांचे आश्वासन

Horticulturists organized to compensate | नुकसान भरपाईसाठी बागायतदार संघटित

नुकसान भरपाईसाठी बागायतदार संघटित

Next

- शौकत शेख

डहाणू : अवकाळी पावसामुळे पालघरमधील चिकू बागायतदारांना मोठा फटका बसलेला असून नुकसान भरपाई मिळावी यासाठी सोमवारी जिल्ह्यातील सर्व चिकू बागायतदारांची सभा डहाणूतील गजानन मंदिर हॉल येथे पार पडली. हक्काच्या चिकू फळाचे आतोनात नुकसान झाल्याने चिकू उत्पादकांनी संघटित होण्याची गरज या वेळी व्यक्त करण्यात आली.

पालघर जिल्ह्यातील मिरची, भाजीपाल्याचे उत्पादक संघटित झाले. त्यांना आमदार आनंद ठाकूर यांनी शासकीय लाभाच्या योजना मिळवून दिल्या. मात्र चिकू पिकाबाबत सरकार उदासीन आहे. चिकू उत्पादकांचे प्रश्न सोडवण्यासाठी उत्पादकांना संघटित होण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष आमदार आनंद ठाकूर यांनी केले. या वेळी चिकू उत्पादक संघाचे अध्यक्ष विनायक बारी, सचिव मिलिंद बाफना, ज्येष्ठ बागायतदार यज्ञेश चुरी, आमदार आनंदभाई ठाकूर, माजी जिल्हा परिषद सदस्य विजय म्हात्रे, प्रदीप चुरी यांच्यासह चिंचणी, वरोर, वानगाव, आसनगाव, चंडीगाव, घोलवड, बोर्डी इत्यादी गावांतील सुमारे तीनशे शेतकरी उपस्थित होते.

येत्या हिवाळी अधिवेशनात हा विषय मांडण्यात येणार आहे. चिकू उत्पादकांच्या शिष्टमंडळासह मुख्यमंत्र्यांना भेटून समस्या सोडवणार आहे. चिकू विमा, नुकसान भरपाई, चिकू रोगांवरील उपाययोजना चिकू संकलन केंद्र आदी प्रश्न सोडवणार असल्याचेही आ. आनंद ठाकूर यांनी सांगितले.

पालघर जिल्ह्यातील खरिपातील मुख्य पीक भात, नागली, तूर, उडीद तसेच भाजीपालावर्गीय पिकांचे फार मोठे नुकसान झाले आहे. त्याचे त्वरित सर्वेक्षण होऊन शासनाकडून मदत मिळायला हवी. कारण अतिवृष्टीमुळे अनेक भागांत पुराचे पाणी आणि पुराबरोबर वाहून आलेली माती शिरलेली आहे. यामुळे भात पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील गरीब जनतेवर उपासमारीची वेळ उद्भवणार आहे, असे महाराष्ट्र राज्य चिकू उत्पादक संघाचे अध्यक्ष विनायक बारी यांनी सांगितले. तसेच १२ जून आणि १३ जून रोजी आलेल्या ‘वायू चक्रीवादळा’मुळे झाडांवरील चिकूची फळे, आंबा फळे पडल्याने बागायतदारांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. यासंदर्भामध्ये कृषीमंत्री, महसूलमंत्री, पालकमंत्री, जिल्हाधिकारी आदींना लेखी निवेदन देऊनही साधी चौकशी देखील करण्यात आलेली नाही, असे ते म्हणाले.

पीक विम्याच्या लाभापासून वंचित

या फळाला विम्याचे कवच २०१२-१२ साली प्राप्त झाले असून यंदा व या विम्याच्या ट्रिगरमध्ये ९० टक्केपेक्षा जास्त आर्द्रता व २० मिलीमीटर पाऊस असे दुहेरी ट्रिगर ठेवल्यामुळे पालघर जिल्ह्यातील सर्व चिकू बागायतदार पीक विम्याच्या लाभापासून वंचित राहण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. खरे तर हे विम्याचे ट्रिगर ठरविताना १२ व १३ जून रोजी आलेल्या वायू चक्रीवादळामुळे झालेले नुकसान आणि दि. २५ जुलैदरम्यानच्या अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीच्या सर्वेक्षणासाठी विद्यापीठाचा अथवा संशोधन केंद्राचा एकही शास्त्रज्ञ पालघर जिल्ह्यामधील कोणत्याही तालुक्यामध्ये फिरकलेला नाही, ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे. तरी शासनाने या जिल्ह्यातील पिकांचे त्वरित सर्वेक्षण होऊन मदत मिळावी, अशी स्थानिकांकडून करण्यात येत आहे.

Web Title: Horticulturists organized to compensate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.