पालघरसाठी रुग्णालयाला मान्यता

By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2019 12:59 AM2019-08-17T00:59:08+5:302019-08-17T00:59:27+5:30

पालघरच्या (नंडोरे) २०० खाटांच्या क्षमतेच्या आणि २०८ कोटी ६२ लाख ७६ हजार किमतीच्या ग्रामीण रुग्णालय उभारणीला राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत प्रशासकीय मान्यता मिळाली आहे.

Hospital Approval for Palghar | पालघरसाठी रुग्णालयाला मान्यता

पालघरसाठी रुग्णालयाला मान्यता

Next

पालघर : पालघरच्या (नंडोरे) २०० खाटांच्या क्षमतेच्या आणि २०८ कोटी ६२ लाख ७६ हजार किमतीच्या ग्रामीण रुग्णालय उभारणीला राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील आरोग्याचे अनेक प्रश्न मार्गी लागण्यास मदत होणार आहे.

पालघरच्या डेअरी डेव्हलपमेंटच्या जमिनीपैकी १० एकर जागेत हे ग्रामीण रुग्णालय उभारले जाणार आहे. सध्या पालघरमधील ३० खाटांच्या क्षमतेचे ग्रामीण रु ग्णालय वाढत्या रुग्णांच्या संख्येमुळे अपुरे पडत होते. जिल्ह्यात ९ ग्रामीण रुग्णालय, ३ उपजिल्हा रुग्णालय, ४६ प्राथमिक आरोग्य केंद्रे तर ३०६ उपकेंद्रे इतकी मोठी आरोग्य यंत्रणा जिल्ह्यात कार्यान्वित असताना इथल्या रुग्णांना उपचारासाठी गुजरात राज्यातील वलसाड, वापी तर सिल्वासा येथील रु ग्णालयात जाऊन उपचार घ्यावे लागत होते. जिल्हा निर्मिती नंतर पाच वर्षांचा कालावधी उलटूनही जिल्हा रुग्णालय होत नसल्याने लोकप्रतिनिधी विरोधात नागरिकांमध्ये संताप होता.

जिल्हा निर्मितीनंतर पालघर मुख्यालयाच्या प्रशासकीय इमारती उभारण्याचे काम मुख्यमंत्र्यांनी सिडकोला दिले असून कोळगाव आणि नंडोरे येथील डेअरी डेव्हलपमेंट विभागाची ४४०.५७ हेक्टर जमीन दिली आहे. या जमिनीपैकी २५ एकर जमीन जिल्हा रुग्णालय आणि शेजारीच वैद्यकीय महाविद्यालयाच्या उभारणीची मागणी जिल्हावासीयांकडून करण्यात आली आहे.

या वैद्यकीय महाविद्यालयात शिकणाऱ्या (इंटर्नशिप) डॉक्टरांचा फायदा जिल्ह्यातील ग्रामीण भागातील आरोग्य सेवा बळकट करण्यासाठी केला जाऊ शकतो, या कारणाने अधिक जमिनीची मागणी करण्यात आली होती. खा. राजेंद्र गावितांनी या संदर्भात मुख्यमंत्री आणि केंद्रातही प्रयत्न सुरू केले असले तरी अधिक १५ एकर जागा सिडकोकडून काढून देण्यात मुख्यमंत्री अनुकूल नसल्याची माहिती पुढे येत होती.

नर्सिंग हॉस्टेल, औषध भंडारही असणार
महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत पालघरच्या नंडोरे येथे या नवीन इमारतीचे बांधकाम करण्याच्या कामास ९ आॅगस्ट २०१९ च्या परीपत्रकान्वये प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. या दोनशे खाटांच्या जिल्हा रुग्णालयाची इमारत, अधिकारी, कर्मचारी निवासस्थाने, प्रशिक्षण केंद्र, नर्सिंग हॉस्टेल, औषध भंडार इत्यादी बांधकामांना सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अवर सचिव कदम-पाटील यांनी प्रशासकीय मान्यता दिली आहे.

Web Title: Hospital Approval for Palghar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.