वाड्यातील सोनार पाडा येथे गरम पाण्याचे झरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2019 10:51 PM2019-07-26T22:51:03+5:302019-07-26T22:52:34+5:30
नागरिकांत कुतूहल : भूगर्भशास्त्र करणार पाहणी
वाडा : काही महिन्यांपासून पालघर जिल्ह्यातील डहाणू आणि तलासरी तालुक्यात भूकंपाचे धक्के जाणवत असतानाच वाड्यातील सोनार पाडा येथे गरम पाण्याच्या झऱ्यांप्रमाणे जमिनीतून वाफा आणि बुडबुड्यांसह निघणारे गरम पाणी आढळून आले आहे. मात्र विद्युत खांबाच्या शेजारी असलेल्या खड्ड्यात हे गरम पाणी आढळल्याने त्याचे नेमके कारण भूगर्भ शास्त्रज्ञांच्या पाहणीनंतरच स्पष्ट होणार आहे.
शुक्रवारी सकाळी सातच्या सुमारास वाड्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या सोनार पाडा येथील एका विजेच्या खांबाजवळून वाफा येत असल्याचे येथील काही ग्रामस्थांच्या लक्षात आले. याचे कारण समजण्यासाठी त्यांनी जवळ जाऊन पाहिले असता विद्युत खांबाच्या शेजारील खड्ड्यातील पाण्यातून आवाजासह बुडबुडे येत असल्याचे त्यांना दिसले. पाण्यात हात घातला असता पाणी अतिशय गरम होते आणि हाताला चटके बसत होते. जवळच वीजेचा खांब असल्याने जमिनीत वीज पसरून पाणी गरम झाल्याची शंका उपस्थित झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण होते. वीज पुरवठा खंडित असतानाही पाण्यातून गरम वाफा निघत असल्याचे पाहून एकच कुतूहल निर्माण झाले आणि बघता बघता येथे नागरिकांची गर्दी झाली.
वाड्याचे तहसीलदार दिनेश कुºहाडे यांनी स्वत: या ठिकाणी येऊन पाहणी केली व विद्युत खांबाशी संपर्क झाल्याने हे पाणी तापले असल्याची शक्यता व्यक्त करु न आम्ही भूगर्भ शास्त्र विभागाला कळविले असून ते लवकरच प्रत्यक्ष पहाणी करून याबाबतीत खुलासा करतील, असे सांगितले.