...अन् अचानक कूपनलिकेतून येऊ लागलं गरम पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2019 11:28 PM2019-12-29T23:28:58+5:302019-12-29T23:29:52+5:30

तीन महिन्यांत घटनेची पुनरावृत्ती; नागरिकांमध्ये कुतूहल

Hot water in a mud well | ...अन् अचानक कूपनलिकेतून येऊ लागलं गरम पाणी

...अन् अचानक कूपनलिकेतून येऊ लागलं गरम पाणी

Next

- अनिरुद्ध पाटील

डहाणू /बोर्डी : चिखले केंद्र शाळेच्या आवारातील कूपनलिकेतून शनिवार, २८ डिसेंबर रोजी सकाळी गरम पाणी येण्यास प्रारंभ झाला असून हा चमत्कार पाहण्यासाठी रविवारी दिवसभर नागरिकांनी गर्दी केली. दरम्यान, डहाणू तहसीलदार राहुल सारंग, गटविकास अधिकारी बी.एच. भरक्षे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाणी नमुने तपासणीकरिता पाठवले आहेत. मागील तीन महिन्याच्या कालावधीत ही दुसऱ्यांदा पुनरावृत्ती असून नागरिकांमध्ये कुतूहल व्यक्त होत आहे.

या कूपनलिकेतून गरम पाणी निघत असल्याचा अनुभव शनिवारी सकाळी काही ग्रामस्थांना आला होता. मात्र सायंकाळपासून हा चमत्कार पाहण्यासाठी गर्दी वाढू लागली, ती रविवारी पूर्ण दिवस होती. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून सूचना फलक लावण्यात आला. दरम्यान, रविवारी दुपारी दीडच्या सुमारास डहाणू तहसीलदार राहुल सारंग, गटविकास अधिकारी बी.एच. भरक्षे यांनी घटनास्थळी भेट दिली. त्यानंतर पाणी नमुने गोळा करण्यासह, भूगर्भ तसेच जिल्हा आपत्ती विभागाला प्रशासनाकडून कळविण्यात आले आहे. त्यांनी नागरिकांना घाबरून न जाण्याचे आवाहन केले आहे.

फेब्रुवारी २०१३ रोजी ही कूपनलिका खोदून, त्यावर हँडपंप तसेच विद्युत मोटारही बसविण्यात आली आहे. या विद्युत पुरवठ्याचा आणि पाणी गरम होण्याचा कोणताही संबंध नसल्याची बाब वाडा तालुक्यातील घटनेतूनही समोर आली आहे. त्यामुळे भूगर्भातील हालचालींमुळे हा प्रकार घडल्याचा अंदाज व्यक्त होत असून त्याचा थेट संबंध या तालुक्यात मागील वर्षभरापासून बसणाºया भूकंपाच्या धक्क्यांशी जोडला जात आहे. शिवाय तालुक्यात एकूण बसलेल्या ५९ धक्क्यांच्या नोंदी पाहता, ४ रिस्टर स्केल तीव्रतेचा टप्पा गाठला आहे. त्यामुळे हा भूकंपाने निर्माण झालेला बदल आहे का? याबद्दल कुतूहल वाढत असून हे तपासण्याची गरज व्यक्त होत आहे.

या प्रकाराबाबत भूगर्भ विभालाला कळविण्यासह, पाण्याचे नमुने तपासण्यास पाठविले आहे. योग्य माहिती हाती आल्यावर कारण स्पष्ट होईल. नागरिकांनी घाबरू नये.
- राहुल सारंग, तहसीलदार, डहाणू

हाताला चटके बसेल एवढं पाणी गरम असून त्या पाण्याचे नमुने घेतले आहेत. विद्यार्थी आणि ग्रामस्थांनी हे पाणी पिऊ नये, त्याऐवजी पर्यार्यीपाणी उपलब्ध केले जाईल.
-बी. एच. भरक्षे, गटविकास अधिकारी, डहाणू

या कूपनलिकेला गरम पाणी येत असल्याने हा अनुभव नागरिक प्रत्यक्ष घेत असून कुतूहलाचा अनुभव घेत आहोत.
- शैलेश गोंधळेकर/ संतोष तांडेल,
चिखले ग्रामस्थ.

Web Title: Hot water in a mud well

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.