धानिवरी येथे घर कोसळले, भूकंपाने नागरिकांत भीतीचे वातावरण
By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2019 12:47 AM2019-01-22T00:47:50+5:302019-01-22T00:47:56+5:30
डहाणू तालुक्यातील कासा जवळील धानिवरी येथील आदिवासी शेतकऱ्यांचे घर रविवारी भूकंप धक्क्याने कोसळले.
कासा : डहाणू तालुक्यातील कासा जवळील धानिवरी येथील आदिवासी शेतकऱ्यांचे घर रविवारी भूकंप धक्क्याने कोसळले. आतापर्यंत बसलेल्या ९ धक्क्यामध्ये याच धक्क्याने घर कोसळले आहे या परिसरातील बहुतांशी घरे वीटा, दगड, व मातीचा चिखल यातून बांधली गेली आहेत. त्यात चुना अथवा सिमेंटचा वापर नसल्याने ती कच्ची आहेत. त्यामुळे भूकंपाच्या लहानशा धक्क्याने ती पत्त्याच्या बंगल्यासारखी कोसळू शकतील व त्यात मोठी जीवितहानी होण्याची शक्यता असल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.
तालुक्यातील समुद्रकिनाºया लगत गावाबरोबरच धुंदलवाडी, दापचरी, करंजवीरा गागणगाव, धानिवरी, आंबोली, रानशेत, गंजाड ओसरविरा, कासा, चारोटी, भागात संध्याकाळी ६ वाजून ४० मिनिटाच्या सुमारास ३.६ रिष्टर स्केल क्षमतेचा भूकंप जाणवला होता. रविवारी झालेल्या ह्या भूकंप धक्याने राघ्या काकड्या लिलका रा.धानिवरी (कोटबीपाडा) यांच्या घराची मागील बाजूची भिंत कोसळली.
ही घटना संध्याकाळी घडली मात्र सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही. यामध्ये मागील बाजूच्या पत्रे, विटा पडल्या आहेत व घराला काही ठिकाणी तडे गेले आहेत. या घटनेची माहिती मिळताच सोमवारी सकाळी महसूल विभागामार्फत नुकसानग्रस्त घराचा पंचनामा करण्यात आला आहे. दरम्यान गेल्या तीन महिन्यांत तालुक्यातील धुंदलवाडी भागात नऊ वेळा भूकंप धक्के बसले आहेत. व काही घरांना तडे गेले आहेत. त्यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे काही ठिकाणी नागरिक उघडयावरच झोपतात. तरीही त्यांच्या मनातील दहशत कायम आहे. सध्या थंडीचा जोर कमी झाल्याने थोडीशी राहत मिळाली आहे.
>नोव्हें. ११ पासून ते रविवारपर्यंतचे भूकंप
गतवर्षीचा सर्वात पहिला भूकंप ११ नोव्हेंबर ३.२ रिष्टर स्केल, २४ नोव्हेंबर ३.३ रिष्टर स्केल, १ डिसेंबर ३.१ व २.९ रिष्टर स्केल एका पाठोपाठ, ३ डिसेंबर ३.२ रिष्टर स्केल, ७ डिसेंबर २.९ रिष्टर स्केल, १० डिसेंबर २.८ व २.७ रिष्टर स्केल (एकापाठोपाठ), २. जानेवारी ३.६ रिष्टर स्केल, २० जानेवारी ३.६ रिष्टर स्केल.