शेतमजुरांचे दर वाढल्याने शेती करायची कशी?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2021 01:43 AM2021-01-10T01:43:34+5:302021-01-10T01:43:52+5:30
यंत्राने होणारी कामे भातशेतीची नांगरणी, चिखलणी केल्याने शेतजमीन योग्य प्रमाणात भुसभुशीत होते. त्यामुळे शेतकऱ्यांची अंगमेहनत, वेळ व पैशाची बचत होते.
वसंत भोईर
लोकमत न्यूज नेटवर्क
वाडा : वाडा तालुक्याला भाताचे कोठार म्हणून संबोधले जाते. येथील ‘वाडा कोलम’ हा भाताचा वाण राज्यभर प्रसिद्ध आहे. मात्र, निसर्गाचा लहरीपणा व भातशेतीसाठी लागणाऱ्या मजुरांची कमतरता, कामाचे वाढलेले दर, यामुळे बदलत्या काळानुसार येथील शेतकरी ट्रॅक्टर, पाॅवर टिलर यांसारख्या आधुनिक यंत्रांचा आधार घेऊन पारंपरिक पद्धतीच्या शेतीला छेद देत ‘हायटेक’ बनू पाहत आहेत, तरीही येथील शेतकऱ्यांना मजुरांची गरज भासत असल्याने शेतमजुरांचा प्रश्न बिकट बनला आहे.
शेती व्यवसायाला पूर्वी वेगळीच धार होती. येथील शेतकरी आपल्याकडील लाकडी नांगर आणि बैलजोड्या, तसेच अन्य अवजारे एकमेकांच्या शेतात नेऊन शेती करत, परंतु काळ बदलला तसे पारंपरिक शेती व्यवसायात यांत्रिक अवजारांचा वापर सुरू झाला आहे. बैलजोडीच्या जागी शेतकरी ट्रॅक्टर, पाॅवर टिलरचा आधार घेत आहेत. दुसरीकडे पूर्वी शेतकरी एकमेकांच्या शेतात जाऊन स्वतः राबत असत. त्याच्याऐवजी आता शेतीत मजूर दिसू लागले आहेत. मात्र, शेतमजुरांचे दर गगनाला भिडले आहेत.
शेतकरी म्हणतात की...
शासनाच्या कृषी विभागाकडून ५० टक्के अनुदानावर ट्रॅक्टर, पाॅवर टिलर राज्यातील शेतकऱ्यांना मिळत आहे, शिवाय महिला बचत गटांसाठी विशेष सवलत असल्याने शेतकरी यांत्रिक अवजारांचा वापर करू लागले आहेत.
- किशोर पाटील,
शेतकरी, देवघर
बैलजोडीच्या किमती वाढल्याने शेतकऱ्यांना त्या खरेदीच्या आवाक्याबाहेर गेल्या आहेत, तसेच माळराने शिल्लक राहिली नाहीत, तसेच बैलांना चारण्यासाठी गुराखी मिळत नाहीत. त्यामुळे आता शेतकरी यंत्राचा आधार घेऊ लागला आहे.
- शांताराम पाटील,
शेतकरी, डाकिवली
कृषी यंत्रांनी घेतली मजुरांची जागा
पूर्वी शेतकऱ्यांना मजुरांवर अवलंबून राहावे लागत असे. मात्र, आता कृषिकामांसाठी अनेक यंत्रे उपलब्ध झालेली असून, मजुरांच्या कामाच्या तुलनेत पाॅवर टिलर आणि ट्रॅक्टरमुळे कामे झपाट्याने होत असल्याने, शेतकऱ्यांची अंगमेहनत, पैसा आणि वेळेची मोठ्या प्रमाणात बचत होऊ लागली आहे.