रुळांमधून जीवघेणा प्रवास किती काळ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2019 11:45 PM2019-07-29T23:45:06+5:302019-07-29T23:45:22+5:30

वाढीववासीयांची व्यथा : महिनाभरापासून धोकादायक प्रवास; लोखंडी प्लेट्स बसवणार कधी?

How long is the life-threatening journey through the trains? | रुळांमधून जीवघेणा प्रवास किती काळ?

रुळांमधून जीवघेणा प्रवास किती काळ?

Next

हितेन नाईक 

पालघर : वैतरणा रेल्वे स्थानकावर पोहचण्यासाठी वाढीव येथील विद्यार्थी, रुग्णांना वैतरणा खाडीवरील रेल्वे पुलाच्या दोन ट्रॅकमधील मोकळ्या जागेतून जाण्याव्यतिरिक्त कुठलाही अन्य पर्याय उपलब्ध नसतो. त्यातच आता त्यांच्या मार्गातील लोखंडी प्लेट्स सडून खाडीत पडल्याने त्यांचा मार्ग धोकादायक बनला असून या प्लेट्स रेल्वे प्रशासनाकडून बसवून दिले जात नसल्याने सर्व नागरिकांना रेल्वे ट्रॅकमधून जीवावर उदार होत प्रवास करावा लागतो आहे.

बाजारहाट, रुग्णालये, नोकरी आदीसाठी उत्तरेकडील सफाळे स्टेशन तर विद्यार्थ्यांना शिक्षण, रोजगारासाठी दक्षिणेकडील वैतरणा स्टेशन आजपर्यंत गाठावे लागते. या दोन्ही स्थानकात पोहोचायचे असेल तर चार रेल्वे ट्रॅकमधील मोकळ्या जागेत टाकण्यात आलेल्या लोखंडी पट्ट्यावरून चालत जात स्टेशन गाठावे लागते. उन्हाळा, पावसाळा, हिवाळा या तिन्ही ऋतूंचा सामना करून मोठी जोखीम पत्करूनच हा रोजचा धोकादायक प्रवास आम्हाला करावा लागत असल्याचे भोईर यांनी लोकमतला सांगितले.
पश्चिम रेल्वेच्या सफाळे आणि वैतरणा रेल्वे स्टेशनच्या पूर्वेला वैतरणा खाडीच्यामध्ये वाढीव-वैतीपाडा ही दोन बेटे असून या पाड्यांची लोकसंख्या सुमारे २ हजार इतकी आहे. शेती आणि रेती व्यवसायाव्यतिरिक्त त्यांच्याकडे उदरनिर्वाहाचे अन्य कुठलेही साधन उपलब्ध नाही. रेती उत्खननावर बंदी तर समुद्राच्या पाण्याच्या पातळीत सतत वाढ होत असल्याने त्यांच्या शेतात खारे पाणी शिरून शेती नापीक बनण्याच्या घटना नेहमीच्या बनल्या आहेत. या भागातून ४० विद्यार्थी तर १५ ते २० महाविद्यालयीन विद्यार्थी शिक्षणासाठी रोज जात असतात. तर दुसरीकडे उदरनिर्वाहासाठी इथले नागरिक, तरुणांना मुंबई, पालघर, तारापूर एमआयडीसीत जाण्याशिवाय अन्य पर्याय नसल्याने दररोज पहाटे या धोकादायक पुलावरूनच स्टेशन गाठावे लागत असल्याचे अमित पाटील यांनी सांगितले. प्रशासनाकडून आजपर्यंत दुर्लक्षित गाव - पाडे म्हणून आम्हाला वागणूक मिळाल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. सतत विद्युत पुरवठा खंडित होणे, आरोग्य उपकेंद्रातून पुरेशी वैद्यकीय सेवा न मिळणे, पिण्याच्या पाण्यासाठी पावसाचे पाणी भरून त्या साठवून ठेवलेल्या पाण्यावर गुजराण करणे आदी डझनभर समस्यांशी आम्ही अनेक वर्षांपासून झगडत असल्याचे प्रफुल भोईर यांचे म्हणणे असून प्रशासन मात्र आमच्याकडे लक्ष देत नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

ट्रॅकमधून चालत असताना येणाऱ्या-जाणाºया ट्रेनमधून प्रवासी निर्माल्याच्या पिशव्या, नारळ खाडीत फेकत असल्याने अनेक प्रवाशांचे मृत्यू होतात, तर कित्येक महिला जखमी झाल्याच्या घटना घडल्या आहेत. गेल्याच महिन्यात रोहिणी पाटील आणि वैशाली पाटील या दोन महिला निर्माल्याच्या पिशव्यांचा फटका बसून जखमी झाल्या. तसेच एखादी ट्रेन आल्यास खाली बसावे लागत असल्याचेही त्यांनी सांगितले.

रेल्वे प्रशासनाला जाग कधी येणार?
गेल्या आठवड्यात या पुलावरच्या लोखंडी प्लेट्स खाली पडल्यानंतर हा नेहमीचा मार्ग धोकादायक बनला. त्यानंतर ग्रामस्थांनी वैतरणा, सफाळे स्टेशन मास्तरशी संपर्क साधला असता त्यांना थेट डहाणू स्टेशन अधीक्षक कार्यालयात जाण्यास सांगण्यात आले.

तरीही त्यावर काहीच उपाययोजना केल्या जात नव्हत्या. या मार्गातील लोखंडी प्लेट्स निघून गेल्याने सुमारे दोन हजार रहिवाशांना जीवावर उदार होत रुळांमधून जीवघेणा प्रवास करावा लागत आहे.

रेल्वे अधिकाऱ्यांशी अनेकवेळा भेटी घेतल्यानंतरही उपाय योजना आखल्या जात नसल्याने दुर्दैवी अपघाताच्या घटना घडल्यावर रेल्वे प्रशासनाला जाग येणार आहे का? असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.

लोखंडी प्लेट बदलण्याचे काम इंजीनिअर विभागाने हाती घेतले आहे. - बाळाराम जी,
स्टेशन मास्तर, वैतरणा
 

Web Title: How long is the life-threatening journey through the trains?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.