अजून किती बळी जाणार?; तारापूर औद्योगिक क्षेत्रासह नागरी वस्त्याही भीतीच्या छायेत
By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2020 11:27 PM2020-01-12T23:27:05+5:302020-01-13T06:35:03+5:30
व्यवस्थेचे अक्षम्य दुर्लक्ष
पंकज राऊत
बोईसर : तारापूर एमआयडीसी-मधील एएनके फार्मा या रासायनिक कारखान्यात शनिवारी एका रिअॅक्टरच्या झालेल्या भीषण स्फोटामुळे सुमारे २५ किलोमीटरचा परिसर हादरून गेला. या घटनेत ८ निष्पापांचा बळी गेला, तर कारखान्याच्या मालकासह ७ जण जखमी झाले आहेत. जखमींपैकी काहींची स्थिती गंभीर आहे. तारापूरला अशा गंभीर घटना ठराविक अंतराने सुरूच असल्याने तारापूर औद्योगिक क्षेत्रासह संपूर्ण परिसरातील नागरी वस्त्याही भीतीच्या छायेत आहेत. व्यवस्थेच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे अशा घटना घडत असून तारापूरला अजून किती बळी घेलते जाणार आहेत?, असा सवाल संतप्त नागरिकांकडून केला जात आहे.
तारापूरमध्ये घडलेल्या घटनेमुळे येथील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरलेले आहे. किडलेली व्यवस्था व त्या व्यवस्थेच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे तारापूरला दिवसेंदिवस बळी जातच आहेत. ठराविक अंतराने अशा प्रकारच्या घटना घडत आहेत. त्यामुळे अजून किती बळी घेतल्यानंतर यंत्रणा जागी होणार आहे, असा सवाल केला जात आहे.
तारापूरमध्ये आग, स्फोट व विषारी वायूची गळती अशी अपघातांची मालिका सुरूच असते. त्यामध्ये आतापर्यंत म्हणजे गेल्या चार दशकात शेकडो निष्पाप कामगारांचे बळी गेले आहेत, तर त्यापेक्षाही अधिक एक जण गंभीरपणे जखमी झाले आहेत. काहीना तर कायमचे अपंगत्व आल्याच्या घटना घडल्या आहेत. अशा प्रकारच्या घटनांमुळे तुटपुंजे उत्पन्न असलेल्या कामगारांची कुटुंबे रस्त्यावर येत आहेत. परंतु तरीही याकडे गंभीरपणे पाहिले जात नाही, ही सर्वात दुर्दैवी बाब आहे. वास्तविक कामगार हा उद्योगाचा कणा समजला जातो, परंतु त्यांच्याकडे आज अक्षम्य दुर्लक्ष केले जात आहे.
आग, स्फोट व वायुगळती यासारख्या दुर्घटना घडतात तेव्हा त्याच्या तपशिलात गेल्यावर हे लक्षात येते की, हे अपघात नसून आवश्यक व योग्य खबरदारी घेतली गेली तर या घटना टाळता येण्याजोग्या असतात. त्यामुळेच अशा दुर्घटनांना यंत्रणा जितक्या जबाबदार असतात, तितकेच बेपर्वा व्यवस्थापन आणि उत्तेजन देणारे व दुर्लक्ष करणारेही असतात. म्हणूनच अशा दुर्घटना वारंवार घडत असतात. या औद्योगिक वसाहतीतील रासायनिक कारखान्यांमध्ये होणाऱ्या अपघातांवर वेळीच उपाययोजना केल्या नाहीत, तर भविष्यात परिसराला फार मोठा धोका होऊ शकतो. तसेच अपघात झाल्यानंतर औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालय तसेच संबंधित यंत्रणेतर्फेचौकशीचे घोडे नाचवून कागदपत्रे रंगविली जातात, असे बोलले जात आहे.
हा जीवन-मरणाचा प्रश्न- सुभाष देसाई
डोंबिवली येथील दुर्घटनेतील काही पीडितांना अजूनही मदत मिळाली नाही, असे पत्रकारांनी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या निदर्शनास आणून दिले. असे कोणी असेल तर त्यांना मदत दिली जाईल. तसेच अशी बेपर्वाई दिसत असेल तर उद्योग राज्यात ठेवावे की नाही याचा विचार करावा लागेल, असे ते म्हणाले. तर तारापूर येथील घटनेत मृत्यू पावलेल्यांच्या नातेवाईकांना पाच लाखाची मदत मुख्यमंत्र्यांनी जाहीर केल्याचे सांगितले.
तारापूर येथील स्फोटामध्ये जे जखमी झाले आहेत, त्यांच्यावर संपूर्ण उपचार आणि ज्यांना त्यांच्या गावाला जायचे असेल तसेच मृतदेह गावाला न्यायचे असतील, त्यांना आर्थिक मदत शासनाकडून केली जाईल, असे उद्योग मंत्री देसाई यांनी सांगितले. शासन संवेदनशील आहे, परंतु मालक व व्यवस्थापनामध्ये अशी संवेदनशीलता का नसावी, असा प्रश्न देसाई यांनी उपस्थित करून हा जीवन-मरणाचा प्रश्न आहे, असेही ते म्हणाले.