बेरोजगारीचे किती बळी?, शॉक लागून माय - लेकराचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2019 12:53 AM2019-11-12T00:53:04+5:302019-11-12T00:53:08+5:30
प्रशासनाने स्थानिक ठिकाणी रोजगार उपलब्ध न केल्याने आदिवासी मजुरांना पोटाची खळगी भरण्यासाठी स्थलांतरित व्हावे लागले आहे.
हुसेन मेमन
जव्हार : एकीकडे अवकाळी पावसाने शेती उद्ध्वस्त झाली, त्यामुळे शेतीतील रोजगार नाही तर दुसरीकडे प्रशासनाने स्थानिक ठिकाणी रोजगार उपलब्ध न केल्याने आदिवासी मजुरांना पोटाची खळगी भरण्यासाठी स्थलांतरित व्हावे लागले आहे. यातूनच गेल्या आठवड्यात दीड वर्षाला मुलासह आईचा शॉक लागून मृत्यू झाला. यानिमित्ताने पुन्हा एकदा रोजगार हमीसह इतर आदिवासी योजना शासनाच्या उदासीनतेमुळे अंमलात न आल्याने आदिवासींना रोजगारासाठी किती कष्ट घ्यावे लागतात ते समोर आले आहे.
वास्तविक, आदिवासी भागात शेतीचे काम संपताच म्हणजे २ आॅक्टोबर, गांधी जयंतीपासून महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेची कामे सुरू करणे आवश्यक आहे. तसे शासनाचे धोरणही आहे. मात्र, प्रशासनाने येथे कामेच सुरू केलेली नाहीत. त्यातच यंदा अवकाळी पावसाने खरीप हंगाम पुरता वाया गेला आहे. त्यामुळे स्थानिक ठिकाणी शेतीचा रोजगारच उपलब्ध झाला नाही. त्यामुळे शेतमजूर बेरोजगार झाला आहे, तर भूमिहीन शेतकरी उपासमारीच्या खाईत ढकलला गेला आहे. त्यामुळे मजुरांनी पोटाची खळगी भरण्यासाठी स्थलांतर केले आहे. याच स्थलांतराने मोखाड्यातील पळसुंडा येथील विकास वाडीतील माय - लेकरांचा बळी घेतला आहे.
विकास वाडीतील काळू, ज्योती हे जोडपे आपल्या दीड वर्षांच्या राघोला घेऊन २०० रूपये रोजाच्या मजुरीसाठी नाशिक जिल्ह्यातील जातेगाव येथे शेतातील कामासाठी स्थलांतर केले. येथे शेतातच झोपडी बांधून हे कुटूंब रहात होते. तेथेच ४ नोव्हेंबर रोजी झोपडीत असलेल्या दीड वर्षांच्या राघोला विजेचा शॉक लागला. त्याला सोडवण्यासाठी ज्योती धावली आणि दोघांनाही शॉक लागल्याने त्यातच या मायलेकांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
मुळात रोजगात हमी, घरकूल योजना, रेशनवर धान्य, विधवांना पगार अशा अनेक योजना आदिवासींसाठी शासन राबवित आहे. मात्र या योजना किती पोकळ आहेत, त्या केवळ कागदावरच कशा राहतात, हे यावरून समोर येते.
>या भागातील लोकांना रोजगारासाठी वावण भटकावे लागते. त्यातून अशा दुर्दैवी घटनाही घडत आहेत. यामुळे आजवरच्या लोकप्रतिनिधींनी काय केले, या भानगडीत न पडता या लोकांना स्थानिक पातळीवर पुरेसा रोजगार कसा उपलब्ध होईल, यासाठी प्रयत्न करायचे आहेत. हा स्थलांतराचा डाग पुसण्यासाठी येत्या काळात युद्ध पातळीवर प्रयत्न करणार आहे.
- सुनील भुसारा, आमदार, विक्रमगड मतदारसंघ