समुद्र साफ करताना हंगेरियन सूनबाईला लागली लॉटरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2022 09:11 AM2022-12-14T09:11:22+5:302022-12-14T09:11:33+5:30

५७ हजारांच्या सापडल्या जुन्या नोटा; बॅग भुईगाव पोलिस चौकीत जमा 

Hungarian daughter-in-law wins the lottery while cleaning the sea | समुद्र साफ करताना हंगेरियन सूनबाईला लागली लॉटरी

समुद्र साफ करताना हंगेरियन सूनबाईला लागली लॉटरी

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
नालासोपारा : वसईत लग्न होऊन आलेली हंगेरियन सुनबाई झिसुझसान फेराओ व तिचा पती लिस्बन फेराओ यांना समुद्र किनारा स्वच्छता मोहिमेत तब्बल ५७ हजारांच्या जुन्या नोटा सापडल्या आहेत. भुईगाव समुद्र किनारा स्वच्छ करताना लिस्बन फेराओला एक बॅग आढळली. संशय आल्याने त्यांनी जवळ जाऊन ती बॅग पाहिली असता, त्या बॅगेत काही जुन्या चलनी नोटा आढळून आल्या. त्यांनी त्या नोटा तत्काळ वसईच्या भुईगाव पोलिस चौकीत जमा केल्या आहेत. 

वसईच्या गिरीज येथे राहणारे फेराओ दाम्पत्य रविवारी आपल्या लहान मुलांसह वसईच्या भुईगाव समुद्र किनाऱ्यावर आले होते. लिस्बन फराओ आणि त्यांची पत्नी झिसुझसान फेराओ आणि त्यांची दोन लहान मुले, असे चौघे मिळून सकाळी वसईजवळील भुईगाव समुद्र किनारा स्वच्छ करीत होते. त्यावेळी त्यांना एक बॅग आढळली. संशय आल्याने फेराओ दाम्पत्याने जवळ जाऊन बॅगेची पाहणी केली. त्यावेळी त्यांना बॅगेत थोडीथोडकी नाही, तर तब्बल ५७ हजारांची रक्कम आढळली. या सर्व नोटा जुन्या होत्या. ती बॅग घेऊन या दाम्पत्याने तत्काळ भुईगाव पोलिस चौकी गाठली.

स्वच्छतेचा बांधला चंग
n यात हजार रुपयांच्या तीन नोटा, तर पाचशे रुपयांच्या १०८ जुन्या नोटा होत्या. नोटबंदीनंतर जुन्या ५०० आणि १००० च्या नोटा बंद झाल्या आहेत. 
n लिस्बन यांची पत्नी झिसुझसान ही मूळची हंगेरी या देशातील नागरिक आहे. वसईतील लिस्बन फेराओसोबत प्रेमविवाह करून सासरी आली. 
n आपल्या चिमुरडीसोबत सहा वर्षांपूर्वी ती वसईच्या समुद्र किनारी सर्वप्रथम गेल्यावर तेथील प्लास्टिक कचरा पाहून तिने तो समुद्र किनारा स्वच्छ करण्याचा चंग बांधला.

स्थानिकांच्या डोळ्यात झणझणीत अंजन
आपल्या पती व मुलींसोबत तिने हा संपूर्ण समुद्र किनारा स्वच्छ करून पर्यटनाच्या नावाखाली समुद्र किनारा अस्वच्छ करणाऱ्या पर्यटकांच्या व स्थानिक नागरिकांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घातले होते. मागील सहा वर्षांपासून हे दाम्पत्य वसई-विरारमधील बीच स्वच्छ करीत आहेत. 

कचरा इतरत्र टाकू नका
आपण ज्या ठिकाणी मुलांसोबत खेळतो, बागडतो, मौजमस्ती करतो तो परिसर नेहमी स्वच्छ असायला हवा. निसर्ग टिकवून ठेवण्यासाठी स्वच्छता राखायला हवी. येणाऱ्या पर्यटकांनी किनारे स्वच्छ नाही केले तरी किमान कचरा इतरत्र टाकू नये, अशी कळकळीची विनंती करतानाच आपण समुद्र किनारी स्वच्छंदपणे फिरत असताना हा कचरा उचलत राहणारच, असा निर्धारही विदेशी वसईकर सूनबाईने व्यक्त केला.

Web Title: Hungarian daughter-in-law wins the lottery while cleaning the sea

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.