पक्षांकडून मॅनेजमेंट गुरूंची शोधाशोध
By admin | Published: June 10, 2017 12:59 AM2017-06-10T00:59:34+5:302017-06-10T00:59:34+5:30
मीरा-भार्इंदर महापालिकेची निवडणूक आॅगस्टमध्ये होण्याची शक्यता असल्याने प्रचार थेट मतदारांपर्यंत पोहोचवण्यासाठी
राजू काळे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
भार्इंदर : मीरा-भार्इंदर महापालिकेची निवडणूक आॅगस्टमध्ये होण्याची शक्यता असल्याने प्रचार थेट मतदारांपर्यंत पोहोचवण्यासाठी निवडणूकपूर्व सोशल मीडियावर संदेशांच्या चाचपणीला सुरुवात करण्यात आली आहे. तसेच निवडणुकीत पक्षाच्या प्रचारासाठी मॅनेजमेंट गुरूंची शोधाशोध सुरू झाली आहे.
निवडणुकीत सर्वच राजकीय पक्षांना मॅनेजमेंट गुरूंची आवश्यकता असते. यामुळे पब्लिक रिलेशनसंबंधित काम करणाऱ्या कंपन्यांना सुगीचे दिवस येतात. अशा कंपन्या प्रत्येक पक्षाच्या स्थानिक नेतृत्वाची भेट घेऊन त्यांना प्रचाराचा आराखडा सादर करतात. निवडणुकीचा प्रचार थेट मतदारांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी स्वीकारणाऱ्या अशा कंपन्यांना काही राजकीय पक्षांकडून नियुक्त केले जाते. या कंपन्यांना मॅनेजमेंट गुरू संबोधले जात असले, तरी हे मॅनेजमेंट पूर्वी पक्षपातळीवरील तज्ज्ञांकडूनच केले जात होते. आजही ते सुरू असले, तरी सध्याच्या डिजिटल युगात मॅनेजमेंट गुरूंची आवश्यकता राजकीय पक्षांना भासू लागली आहे. अशा मॅनेजमेंट गुरूंची मीरा-भार्इंदर महापालिका निवडणुकीत अनेकदा नियुक्ती करण्यात आली आहे. यंदाच्या निवडणुकीतही त्यांची शोधाशोध काही पक्षांकडून सुरू झाली आहे. तर, काहींनी नियुक्तीदेखील केली आहे. त्यांनी सोशल मीडियावर पक्ष व निनावी उमेदवारांच्या प्रचाराचा नारळ फोडण्यास सुरुवात केली आहे. मात्र, ती संदेशांची चाचपणी सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. यात उमेदवाराचे नाव तूर्तास नमूद नसले, तरी प्रचाराला मात्र सुरुवात झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
नियुक्त केलेल्या कंपन्यांकडून प्रभागांचे सर्वेक्षण, त्यातील मतदारांचा कौल कोणत्या राजकीय पक्षाच्या बाजूने आहे, मतदारयाद्यांतील नोंद आदींचा आढावाही घेतला जातो. त्याचा दैनंदिन अहवाल स्थानिक नेतृत्व तसेच पक्षाच्या निवडणूक नियंत्रण पथकाला दिला जातो. यावरून, पक्षाची स्थिती व मतदारांची मानसिकता ठरवून प्रचाराची दिशा ठरवली जाते. यासाठी त्या कंपन्यांना मोठी रक्कम दिली जाते. काही पक्षांत स्वतंत्र तज्ज्ञांचे पथक नेमले जाते.