हुंड्यासाठी आईसह पोटातील बाळाला औषध देवून ठार मारणाऱ्या नवरा व सावत्र मुलाला अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2024 07:01 PM2024-07-16T19:01:55+5:302024-07-16T19:02:55+5:30
Nalasopara Crime News: हुंड्यासाठी आईसह पोटातील बाळाला औषध देऊन ठार मारणाऱ्या नवरा व सावत्र मुलाला अटक करण्यात मध्यवर्ती गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांनी अटक केले आहे.
- मंगेश कराळे
नालासोपारा - हुंड्यासाठी आईसह पोटातील बाळाला औषध देऊन ठार मारणाऱ्या नवरा व सावत्र मुलाला अटक करण्यात मध्यवर्ती गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांनी अटक केले आहे.
आचोळे पोलीस ठाण्याच्या हद्दीतील महिलेला आरोपी पती जयप्रकाश दुबे व सावत्र मुलगा सचिन दुबे या दोघांनी लग्न झाल्यानंतर तिच्या घरच्यांनी लग्नामध्ये काही दिले नाही या कारणावरून दारू पिऊन मारहाण करत होता. ५ मे रोजी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास आरोपी जयप्रकाशने दारू पिऊन आठ महिन्याची गरोदर असतानाही पीडित महिलेला मारहाण केली. त्यानंतर आरोपी सचिनने तिला पकडून ठेवल्यावर जयप्रकाशने कोणते तरी औषध पिण्यासाठी दिले. तिच्या पोटातील बाळ मयत झाल्याने २० एप्रिलला आचोळे पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. आरोपी पती जयप्रकाशला आचोळे पोलीसांनी अटक करून वसई न्यायालयात हजर केल्यावर न्यायालयाने त्याला जामीनावर मुक्त केले. परंतु आरोपी सचिन दुबे हा आचोळे पोलीसांना मिळून येत नव्हता.
पीडित महिला ही नालासोपाऱ्याच्या स्टार हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असताना २ जुलैला मृत्यू झाला आहे. याप्रकरणी आचोळे पोलिसांनी त्या गुन्ह्यात हत्येचे कलम वाढविण्यात आले आहे. आरोपी जयप्रकाशचा जामीन रद्द करण्यासाठी वसई न्यायालयात अहवाल सादर केला होता. न्यायालयाने ११ जुलैला आरोपीचा जामीन रद्द करण्यात आला. तेव्हापासून दोन्ही आरोपी मिळून येत नव्हते.
हुंड्यासाठी पत्नी व तिच्या पोटातील बाळाची हत्या या गंभीर व संवेदनशील गुन्ह्यातील आरोपी मिळून येत नसल्याने वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी तात्काळ आरोपीचा शोध घेऊन अटक करण्याचे आदेश दिले होते. त्याअनुषंगाने मध्यवर्ती गुन्हे प्रकटीकरण शाखेचे प्रभारी पोलीस निरीक्षक राहुल राख यांनी पोउपनिरी हितेंद्र विचारे, पोहवा राजाराम काळे, शिवाजी पाटील, गोविंद केंद्रे, हनुमंत सूर्यवंशी, संग्राम गायकवाड, संतोष मदने, अकिल सुतार, साकेत माघाडे, नितीन राठोड असे तपास पथक तयार करून त्यांना तात्काळ आरोपीच्या शोधार्थ रवाना केले. नमूद पथकाने सलग ४ दिवस अहोरात्र मेहनत घेऊन तपासात सातत्य ठेवून तांत्रिक तपास व गोपनीय माहितीचे आधारे सापळा लावून पाहीजे आरोपी जयप्रकाश दुबे (५०) आणि सचिन दुबे (२०) यांना नालासोपारा येथून १६ जुलैला शिताफिने ताब्यात घेतले. नमुद गुन्ह्यात सहभाग निष्पन्न झाल्याने त्यांना पुढील कारवाईसाठी आचोळे पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिले आहे.