सावकारीचा गुन्हा टाळण्यासाठी फिनाईल पिऊन पतीपत्नीचा आत्महत्येचा प्रयत्न
By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2024 05:31 PM2024-09-06T17:31:12+5:302024-09-06T17:31:44+5:30
नायगाव पोलीस ठाण्यातील घटना
- मंगेश कराळे
लोकमत न्यूज नेटवर्क,
नालासोपारा - सावकारीचा गुन्हा दाखल होऊ नये यासाठी पती पत्नीने नायगांव पोलीस ठाण्याच्या आवारातच फिनाईल पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना शुक्रवारी दुपारच्या सुमारास घडली आहे. पत्नीला उपचारासाठी पोलिसांनी जूचंद्रच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात तर पतीला मनपाच्या सोपारा हॉस्पिटलमध्ये भर्ती केले आहे. नायगांव पोलीस पुढील प्रकरणाचा तपास करत आहे.
नायगांवच्या वाकीपाडा येथे मोहन गोळे (५४) आणि त्यांची पत्नी गीता (५०) यांच्यासह राहतात. नालासोपारा येथे राहणारे सुभाष उत्तेकर यांना पैश्याची अडचण असल्याने गोळे परिवाराकडून जानेवारी महिन्यात १० टक्के व्याजाने अडीच लाख व फेब्रुवारी महिन्यात अडीच लाख असे एकूण ५ लाख रुपये घेतले होते. त्यावेळी गोळे यांनी २५ हजार रुपये व्याजाचे कापून घेऊन उर्वरित पैसे सुभाष यांना दिले. त्यानंतर खात्यावर ५० व एकदा २५ असे एकूण ७५ हजार गोळे यांच्या खात्यावर सुभाष यांनी पाठवून दिले. उर्वरित ४ लाख रुपये व व्याजासाठी तगादा लावून आत्महत्या करण्याची सुभाष यांना धमकी देत होते.
दररोज फोनवरून धमकी व आत्महत्या करण्याची धमकी दिली जात होती. सुभाष यांनी घाबरून नालासोपारा पोलिसांना माहिती दिली व नंतर ३ सप्टेंबरला पोलीस आयुक्त मधुकर पांडेय यांना भेटून तक्रार अर्ज दिला होता. यानंतर गोळे यांची कुणकुण लागल्याने ५ सप्टेंबरला नायगांव पोलीस ठाण्यात अर्ज केला. शुक्रवारी सकाळी अर्जदार आणि गैरअर्जदार या दोघांनाही नायगांव पोलीस ठाण्यात बोलावले होते. यानंतर सुभाष यांनी थोडा वेळ मागितला पण गोळे परिवार थांबण्यासाठी तयार नव्हते व पैसे आत्ताचे आत द्या असे बोलून पोलीस ठाण्याच्या बाहेर आले. दोघा पती पत्नीनी सोबत आणलेले फिनाईल पोलीस ठाण्याच्या आवारात पिले. पोलिसांनी लगेच खाजगी वाहनांतून पती पत्नीला जुचंद्रच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी भर्ती केले.
व्याजाचे व मुद्दल पैसे देत नसल्याने गोळे परिवाराने पोलीस ठाण्यात गुरुवारी लेखी अर्ज दिला होता. चौकशीसाठी बोलावल्यावर अर्जदार व गैरअर्जदार शुक्रवारी सकाळी पोलीस ठाण्यात आले होते. गोळे पती पत्नीने सावकारी गुन्हा दाखल होऊ नये यासाठी फिनाईल पिऊन आत्महत्या करण्याचा स्टंट केला आहे. संपूर्ण प्रकरणाची चौकशी व तपास सुरू आहे. -
रमेश भामे (वरिष्ठ पोलीस निरीक्षक, नायगांव पोलीस ठाणे)