पतीचा राग पोलिसांवरच काढला, महिलेविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2019 02:28 PM2019-12-18T14:28:30+5:302019-12-18T14:29:26+5:30
पोलीस निरीक्षकांसहित महिला व पुरुष पोलिसांना शिवीगाळ व मारहाण
आशिष राणे
वसई - माणिकपूर पोलीस निरीक्षक राजेंद्र कांबळे यांच्यासहीत अन्य महिला पोलीस उपनिरीक्षक, कर्मचारी यांना शिवीगाळ व मारहाण करून त्यांच्या अंगावर धावून जाण्याचा भयंकर प्रकार घडला आहे. वसईतील एका विवाहित महिलेने माणिकपूर पोलीस ठाण्यात केल्याची गंभीर बाब समोर मंगळवारी रात्री उघडकीस आली आहे. या घटनेची गंभीर दखल घेत पोलीस निरीक्षक राजेंद्र कांबळे यांच्याकडून आरोपी परमिता शौमिक देशमुख या महिलेवर माणिकपूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या संदर्भातील माहितीनुसार, आरोपी महिला परमिता शौमिक देशमुख ढोले हिचा पती शौमिक ढोले आपली पत्नी त्रास देत असल्याच्या कारणावरून पत्नी विरोधात तक्रार देण्यास ते मंगळवारी रात्री माणिकपूर पोलीस ठाण्यात आले होते. त्याचवेळी त्यांची पत्नीही माणिकपूर पोलीस ठाण्यात पोहोचली आणि पोलिसांसमक्षच पतीला मारहाण करून आली. यावेळी महिला पोलिस कर्मचारी सुप्रिया पाटील यांनी हस्तक्षेप केला असता आरोपी महिलेने प्रथम तिचे केस उपटले व तिला मारहाण केली. त्यामुळे लागलीच महिला पोलीस उपनिरीक्षक डोके, उपनिरीक्षक भागवत, पोलीस कर्मचारी ताकवाले, आव्हाड यांच्यासह माणिकपूर पोलिस निरीक्षक राजेंद्र कांबळे या सर्वांनी हस्तक्षेप केला असता आरोपी महिलेने या सर्वांनाही अर्वाच्च शिवीगाळ करत मारहाण केली.
या संदर्भात माणिकपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या महिलेने चक्क सगळं माणिकपूर पोलीस स्टेशनच डोक्यावर घेऊन तेथील खुर्च्याही तोडल्या, अखेर या महिलेल्या ताब्यात घेऊन तिच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करून तिला अटक केली. दरम्यान तासभर सुरू असलेल्या पती-पत्नी आणि पोलीस स्टेशन नाट्ट्याची वसईभर सर्वत्र चर्चा होत आहे.