वाढवण लढ्यात मी तुमच्यासोबत; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेेंची ग्वाही
By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2020 11:44 PM2020-02-28T23:44:39+5:302020-02-28T23:46:26+5:30
आंदोलनाला शिवसेनेची ताकद
पालघर : वाढवण बंदराला स्थानिकांचा एकमुखाने विरोध असल्याने शिवसेना त्यांच्यासोबत कालही होती, आजही आहे आणि उद्याही स्थानिकांच्या सोबतच राहील, असे वचन शिवसेनेचे पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वाढवण बंदरविरोधी संघर्ष समितीसोबत झालेल्या चर्चेदरम्यान शुक्रवारी दिले. मी काल शिवसेना पक्षप्रमुख म्हणून बोलत होतो. आज मुख्यमंत्री म्हणून जबाबदारीने बोलत असल्याचे त्यांनी सांगिल्याने या आंदोलनाला आता सेनेची ताकद मिळणार आहे.
यंदा विधानसभा निवडणुकीनंतर अचानक युतीमध्ये बेबनाव निर्माण झाल्याने महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होऊन मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांची सत्ता प्रस्थापित झाली. त्यामुळे वाढवणवासीयांचे मनोधैर्य उंचावले होते. बंदरविरोधी संघर्ष समितीने मुख्यमंत्र्यांची भेट व्हावी म्हणून खासदार गावित, मंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून प्रयत्न करूनही भेट मिळत नसल्याने ‘लोकमत’ने २४ फेब्रुवारीच्या अंकात भेट मिळत नसल्याचे वृत्त प्रकाशित केले होते. त्याचे पडसाद किनारपट्टीवर उमटल्याने स्थानिक शिवसेना पदाधिकाऱ्यांना जाब विचारला जाऊ लागला होता. सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, मंत्री सुभाष देसाई, खासदार राजेंद्र गावित, पालकमंत्री दादा भुसे, संपर्क प्रमुख रवींद्र फाटक, आ.श्रीनिवास वणगा यांच्या प्रयत्नाने आज अखेर बंदर संघर्ष समितीचे अध्यक्ष नारायण पाटील, अशोक आंभिरे, वैभव वझे, एनएफएफचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, कृती समिती अध्यक्ष लिओ कोलासो, महिला जिल्हाध्यक्ष ज्योती मेहेर, राजन मेहेर, रामकृष्ण तांडेल यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसोबत भेट घडवून आणली. या वेळी मुख्यमंत्र्यांनी समितीसोबत ४५ मिनिटे चर्चा केली आणि मी तुमच्यासोबत असल्याचे सांगितले.