बुलडोझरवरच गावीत बसलेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2018 05:49 AM2018-05-19T05:49:49+5:302018-05-19T05:49:49+5:30
वाढवण बंदराला प्रखर विरोध करणारे राजेंद्र गावित आता भाजापामध्ये गेले आहेत. पूर्वी वाढवण बंदर उभारल्यास बुलडोझरखाली प्रथम मी जाईन अशी भाषा करणारे ते आता वाढवण बंदर उभारणाऱ्या बुलडोझरवरच जाऊन बसले आहेत, अशी टीका विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखेपाटील केली.
डहाणू : वाढवण बंदराला प्रखर विरोध करणारे राजेंद्र गावित आता भाजापामध्ये गेले आहेत. पूर्वी वाढवण बंदर उभारल्यास बुलडोझरखाली प्रथम मी जाईन अशी भाषा करणारे ते आता वाढवण बंदर उभारणाऱ्या बुलडोझरवरच जाऊन बसले आहेत, अशी टीका विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखेपाटील केली. येथील कॉँग्रेस भवनामध्ये शुक्रवारी आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते.
ते म्हणाले की, अशा दलबदलू व्यक्तीवर किती व का विश्वास ठेवायचा. आता हे नंदुरबारचे पार्सल पुन्हा नंदुरबारला पाठवा, असे आवाहन त्यांनी केले. त्यांनी शुक्रवारी डहाणू व जव्हार भागामध्ये दौरा करून कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. गावितांना कॉँग्रेसने मोठे केले मात्र ते उपकार विसरले. शिंगडा हेच एकमेव निष्ठावंत आहेत. त्यामुळे त्यांच्या पाठीशी राहा, असे ते म्हणाले.
तर, दिंवंगत खासदार चिंतामण वनगा यांच्या नावे शिवसेना व भाजपा हे दोन्ही पक्ष मतांचा जोगवा मागत आहेत. मग वनगांचा खरा वारसदार कोण, असा खोचक सवाल उपस्थित करून, आ. आनंद ठाकूर यांनी या वेळी सेना-भाजपाची खिल्ली उडविली.
माजी पालकमंत्री गणेश नाईक म्हणाले की, भाजपाकडून सध्या सत्तेचा दुरु पयोग सुरू आहे. भाजपा पैसा, सत्तेच्या जोरावर निवडणुका जिंकत आहेत. त्यांचा फार काळ शिल्लक राहिलेला नाही. त्यामुळे फसवणूक करणाºया सरकारवर विश्वास ठेऊ नका, असे आवाहनही नाईक यांनी या वेळी केले.
या वेळी माजी मंत्री शंकर नम, माजी मंत्री मोघे, तालुका अध्यक्ष पांडुरंग बेलकर, जिल्हा उपाध्यक्ष बाबा जोशी, पालघर तालुका अध्यक्ष संजय पाटील आदींसह डहाणू तलासरी, पालघर भागातील काँग्रेस, तसेच राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
>शिवसेना म्हणजे गुळाच्या ढेपेला चिकटलेला मुंगळा
जव्हार : पालघर लोकसभा पोटनिवडणुकीत जर आम्हाला भाजपाने विनंती केली असती, तर आम्हीही पुलुस विधानसभेसारखा निर्णय घेतला असता, या सेना भाजपाला फक्त श्रद्धांजलीचे राजकारण करायचे आहे. दोन्ही पक्ष सांगतात की, आम्हाला मत दिले, तर वणगांना श्रद्धांजली. मात्र, प्रत्यक्षात या दोघांना स्वत:च्या पक्षातला उमेदवार मिळत नाही, हे दुर्दैव आहे. शिवसेना हा सत्तारूपी गुळाच्या ढेपेला चिकटलेला मुंगळा असल्याची टीका राज्याचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली. काँग्रेस, राष्ट्रवादीकडून जव्हार येथील सनसेट येथे शुक्रवारीच जाहीर प्रचार सभेचे आयोजन केले होते. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी माजी मंत्री गणेश नाईक, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील भुसारा यांनी मार्गदर्शन केले.