‘राजेंद्र गावित निवडून आल्यास सत्तेच्या माध्यमातून विकास शक्य’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2018 03:08 AM2018-05-20T03:08:19+5:302018-05-20T03:08:19+5:30
पालघर विधानसभा क्षेत्राची जबाबदारी मुख्यमंत्र्यांनी आ. दरेकरांवर सोपवली आहे.
पालघर : केंद्रात, राज्यात, जिल्हा परिषदे वर आपली भाजपची सत्ता असून या पोटनिवडणुकीत आपले उमेदवार राजेंद्र गावित निवडून आल्यास सत्तेच्या माध्यमातूनच विकास घडत असल्याने त्यांना बहुमताने निवडून आणण्यासाठी कंबर कसून काम करा असे आवाहन भाजपा चे आ.प्रवीण दरेकर यांनी आपल्या कार्यकर्त्यांशी बोलताना व्यक्त केला.
पालघर विधानसभा क्षेत्राची जबाबदारी मुख्यमंत्र्यांनी आ. दरेकरांवर सोपवली असून पंचायत समिती गण आणि जिल्हापरिषद गट, मंडळ, शक्ती प्रमुख आणि बूथ अध्यक्षांची बैठक माहीम येथे आयोजित करण्यात आली होती. यावेळी तालुकाध्यक्ष प्रमोद आरेकर, प्रशांत पाटील, राजन मेहेर, सुजित पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते. ज्या कार्यकर्त्यांच्या बळावर ही निवडणूक जिंकून यायची आहे, अश्या कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधला.
मोदी नावाचे विकासाचे वादळ पूर्ण देशात असल्याने येथील शेतकरी, मच्छीमार, आदिवासी, भूमिपुत्र असा जनाधार भाजपा सोबत आहे. तसेच मुख्यमंत्री फडणवीसांच्या रूपाने या सर्वांनी विकासाचा मुख्य चेहरा म्हणून भाजपाला पसंती दिली आहे. यावेळी दरेकर यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधून त्यांच्या समस्या व उणीवा दूर केल्या जातील असा विश्वास त्यांना व्यक्त केला. पक्षाचे निष्ठावंत असलेले स्व. चिंतामण वनगा हे आजही भाजपाचेच आहेत. मात्र, शिवसेनेने त्यांच्या कुटुंबा सोबत चुकीचे केले असून असे गलिच्छ राजकारण सेने करीत असल्याची टीका केली. सत्तेत मांडीला मांडी लावून बसायचे आणि आपली मित्र पक्षाचेच उमेदवार पळवायचे हे जनतेने पाहिलेले आहे. त्यामुळे जनताच त्यांना त्यांची जागा दाखवून देईल असेही त्यांनी शेवटी सांगितले. येथील आदिवासी, मच्छीमार आणि सर्वसामान्यांना आपलासा वाटणारा उमेदवार भाजपाला मिळाला असून राज्यमंत्री असताना त्यांनी जिल्ह्यात केलेली विकास कामे ही भाजपासाठी जमेची बाजू असल्याने मतदारांचा कौल आपल्या सोबतच राहील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. या निवडणुकीवर महाराष्ट्रासह देशाचे लक्ष लागून राहिले असून जनाधार सांगणारी ही निवडणूक आहे. त्यामुळे झटून कामाला लागण्याचे आवाहन त्यांनी केले. यावेळी शिरगाव मधील अनेक कार्यकर्त्यांनी भाजप पक्षात प्रवेश केला.