आयुक्त म्हणतात नव्याने बॅनर लागले तर गुन्हा दाखल करू
By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2018 08:06 PM2018-10-03T20:06:47+5:302018-10-03T20:07:25+5:30
मीरा भाईंदर मध्ये बॅनरबाजी सुरूच, आधीचे बॅनर सुद्धा तसेच
मीरारोड - 1 ऑक्टॉबर पासून मीरा भाईंदर मध्ये बॅनरना परवानगी बंद केल्याचा ठराव करून शहरातील बॅनर , लोखंडी फलक आदी काढण्याची धडक मोहीम महापालिकेने हाती घेतली होती . पण शहरातील अनेक मुख्य रस्ते व परिसरात अनेक बॅनर लागलेलेच असून नव्याने सुद्धा बॅनर लावले जात आहेत . तर आयुक्त बालाजी खतगावकर यांनी, आधीचे लागलेले बॅनर काढून घेण्याचे आदेश दिले असून नव्याने जे बॅनर लागले असतील त्यांच्यावर गुन्हा दाखल केला जाईल असे सांगितले .
मीरा भाईंदर मध्ये बेकायदा बॅनर , लोखंडी फलक काढण्याची कारवाई महापालिका आयुक्तांसह महापौर , आमदार , नगरसेवक आदींनी मोठा गाजावाजा करत 1 ऑक्टॉबर रोजी केली होती . सोशल मीडियावर सुद्धा या बॅनर , फलक कारवाई चा प्रचार करण्यात आला . स्वतः लोकप्रतिनिधीच स्वतःचे लागलेले बेकायदा बॅनर काढत असल्याचे पाहून उलट सुलट चर्चा रंगल्या. शहरातील सर्व बॅनर काढले गेले असून या पुढे बॅनर दिसले तर गुन्हा दाखल करू असा इशारा खुद्द आयुक्त खतगावकर यांनी दिला होता .
परंतु सेव्हन स्क्वेअर शाळा , दीपक रुग्णालय मार्ग , गीता नगर , सावरकर चौक सह अनेक भागात सर्रास मोठमोठे बॅनर लागलेले असून काही बॅनर तव्याने सुद्धा लागलेले दिसून आले आहेत . विशेष म्हणजे यात सत्ताधारी भाजपा सह बविआ व काही संस्थांचे बॅनर लागलेले आहेत . सार्वजनिक ठिकाणी व झाडांवर बॅनर लागलेले आहेत .
महापालिका आयुक्त व प्रशासन सत्ताधारी भाजपाच्या तालावर नाचत असून मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश सुद्धा धाब्यावर बसवत आहेत . स्थानिक भाजपा नेत्याचे , नगरसेवक , गणेशोत्सवाचे बॅनर शहरात सर्वत्र बेकायदा लागले होते . आजही अनेक बॅनर लागलेले आहेत . पण ते काढून न्यायालयाने गुन्हे दाखल करायचे आदेश दिले असताना आयुक्त व प्रशासन कारवाई करत नाही . यातून बेकायदा बॅनर व ते लावणाऱ्या लोकप्रतिनिधींना संरक्षण द्यायचे असल्याचे स्पष्ट होते असे तक्रारदार कृष्णा गुप्ता , प्रदीप जंगम , ब्रिजेश शर्मा आदींनी म्हटले आहे .
झाडांवर लावलेल्या बॅनर , फलक मुळे झाडांना इजा पोहचवली जात आहे . अश्या फलक - बॅनरबाजांवर नागरी झाडांचे संरक्षण जतन कायद्या खाली गुन्हे दाखल केले जात नाहीत . बेकायदा बॅनर लावणे व ते काढणे या साठी पालिकेचे लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान केले त्याला जबाबदार कोण ? असा सवाल तक्रारदारांनी केलाय .
तर महासभेच्या बॅनर बंदी नंतर पालिकेने शहरातील बेकायदा बॅनर , लोखंडी फलक आदी काढून टाकले असून आधीचे जे बॅनर शिल्लक राहिले असतील ते काढून टाकण्यास सांगितले आहे . आज 1 ऑक्टॉबर पासून नव्याने लागलेल्या बॅनरचा शोध घेऊन पंचनामे करून गुन्हे दाखल करायचे आदेश प्रभाग अधिकाऱ्यांना दिले आहेत असे आयुक्त खतगावकर म्हणाले .