वसई किल्ल्याचे पावित्र्य नष्ट कराल तर घबरदार

By admin | Published: December 29, 2016 02:20 AM2016-12-29T02:20:16+5:302016-12-29T02:20:16+5:30

थोर पुरुषांच्या शौर्याचे प्रतीक असलेल्या ऐतिहासिक किल्ल्यांचे पावित्र्य नष्ट करण्याचा प्रयत्न कराल तर चालत घरी जाऊ शकणार नाही, असा सज्जड इशारा दुर्गप्रेमींनी समाजकंटकांना

If you destroy the Vasai fort, you will be terrified | वसई किल्ल्याचे पावित्र्य नष्ट कराल तर घबरदार

वसई किल्ल्याचे पावित्र्य नष्ट कराल तर घबरदार

Next

वसई : थोर पुरुषांच्या शौर्याचे प्रतीक असलेल्या ऐतिहासिक किल्ल्यांचे पावित्र्य नष्ट करण्याचा प्रयत्न कराल तर चालत घरी जाऊ शकणार नाही, असा सज्जड इशारा दुर्गप्रेमींनी समाजकंटकांना दिला आहे. तर ३१ डिसेंबरला वसईच्या किल्ल्यात धुडगूस घालणाऱ्या तळीरामांना रोखण्यासाठी ‘आमची वसई’चे कार्यकर्ते किल्ल्यात पहारा देऊन धडा शिकवणार आहेत.
दुर्गप्रेमींच्या ३५ तरुणांनी काल नाताळनिमित्ताने वसईच्या किल्ल्यात स्वच्छता मोहीम राबवली. चिमाजी आप्पा स्मारक, नागेश्वर मंदिर, चक्री जीना आदी परिसराची या वेळी सफाई करण्यात आली. प्लास्टीकच्या पिशव्या, कागदांची रद्दी, दारूच्या रिकाम्या बाटल्या असा १० मोठ्या बॅगा भरून कचरा या मोहिमेत गोळा करण्यात आला. या मोहिमेत बालगोपाळही सहभागी झाले
होते.
किल्ल्यांमध्ये दारू पिऊन त्याचे पावित्र्य नष्ट करू नका, असे आवाहनही या वेळी करण्यात आले. दरवेळी आम्ही किल्ले स्वच्छ करण्याची मोहीम राबवतो.
प्रत्येक वेळी आवाहन करूनही काही निर्लज्ज बेवडे किल्ल्यात धुडगूस घालतातच. त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला तर शिव्या आणि दमदाटीला सामोरे जावे लागते.
तरीही आम्ही सामंजस्याची भूमिका घेऊन त्यांचे विचार परिवर्तन करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी केलेली घाण निमूटपणे साफ करीत राहिलो. दर दोन महिन्यांनी फेरी घातल्यावर किल्ल्यांची तीच दुरवस्था समोर येत आहे. त्यामुळे या वेळी मोहिमेत थोडा बदल करण्यात आला आहे. ३१ डिसेंबरला किल्ल्यात पार्टी करण्याचा प्लॅन करणाऱ्यांना आवाहन करण्यात येणार आहे. फलक दाखवून त्यांना आपण योग्य वागतोय का? याचा त्यांना विचार करायला लावण्यात येणार आहे. तरीही त्यांचा हेकेखोरपणा कायम राहिला तर मग मात्र आम्हाला चौदावे रत्न दाखवावे लागेल. त्यासाठी दुर्गप्रेमी किल्ल्यात तैनात राहणार आहेत, असा इशारा देण्यात आला आहे.
सार्वजनिक ठिकाणी, पुरातत्त्वीय वास्तूत व पर्यटनस्थळी मद्यपान करणे हा कायद्याने गुन्हा आहे. जी भूमी नरवीर चिमाजी आप्पा व असंख्य मावळ्यांच्या पदस्पर्शाने व पराक्रमाने पावन झाली. अत्याचारी व पोर्तुगीजांपासून मुक्त करण्यासाठी २१ हजार मराठ्यांनी जेथे बलिदान दिले. ज्या भूमीत युरोपीय सत्तेविरुद्ध भारतातील पहिला विजय मिळवला गेला. अशा पावन व ऐतिहासिक ठिकाणी मद्यपान व धूम्रपान करून दारूच्या बाटल्यांचा ढीग करण्याचे थिल्लर प्रकार करायला लाज वाटली पाहिजे. जनाची नाही तर किमान मनाची तर लाज बाळगा, असा संताप कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे. (प्रतिनिधी)

तळीरामांना इशारा !
वसई किल्ल्यात ३१ डिसेंबरला दारूच्या पार्ट्या झोडणाऱ्यांना ‘आमची वसई’चे कार्यकर्ते चोप देणार आहेत. त्यासाठी कार्यकर्ते किल्ल्यात पहारा देत गस्त घालणार आहेत. जागतिक कीर्र्तीच्या ऐतिहासिक वसई किल्ल्यात मद्य पार्टीचे नियोजन करून वसईची अस्मिता मलीन करू नका. जर आमच्या वसईच्या गड-किल्ल्यांवर येऊन ते अपवित्र करण्याचे ठरवाल तर याद राखा, गाठ आम्हा देशभक्त वसईकरांशी आहे, असा इशारा ‘आमची वसई’ने दिला आहे.

Web Title: If you destroy the Vasai fort, you will be terrified

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.