भूमिपुत्र कामगारांना कामावर न घेतल्यास रस्त्यावर उतरू!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 1, 2020 11:28 PM2020-03-01T23:28:23+5:302020-03-01T23:28:29+5:30
केंद्रात एका मोठ्या प्रकल्पाची उभारणी करणाऱ्या हिंदुस्थान कन्स्ट्रक्शन कंपनीने त्यांच्याकडे मागील चार वर्षांपासून काम करणा-या घिवली गावातील ७१ कंत्राटी कामगारांना पुन्हा कामावर न घेतल्यास रस्त्यावर उतरू
बोईसर : तारापूर येथील भाभा अणू संशोधन केंद्रात एका मोठ्या प्रकल्पाची उभारणी करणाऱ्या हिंदुस्थान कन्स्ट्रक्शन कंपनीने त्यांच्याकडे मागील चार वर्षांपासून काम करणा-या घिवली गावातील ७१ कंत्राटी कामगारांना पुन्हा कामावर न घेतल्यास रस्त्यावर उतरू, असा इशारा पालघर लोकसभेचे खासदार राजेंद्र गावित यांनी हिंदुस्थान कन्स्ट्रक्शन कंपनीच्या अधिकाऱ्यांना दिला आहे.
तारापूर येथे भाभा अणू संशोधन केंद्रात मागील चार वर्षांपासून इंटरग्रेटेड न्यूक्लियर रिसायकल प्लांट (आयपी) सुमारे १५०० कोटी रुपये खर्च करून उभारण्यात येत असून याकरिता सुमारे १२०० कंत्राटी कामगार काम करीत आहेत. यामध्ये तारापूर बीएआरसी लगत असलेल्या घिवली गावातील प्रकल्पग्रस्त व प्रकल्पबाधित असे मिळून एकूण सुमारे २१० कंत्राटी कामगार मागील ४ वर्षांपासून काम करीत आहेत. त्यापैकी ७१ कंत्राटी कामगारांना कुठल्याही प्रकारची पूर्वसूचना न देता कामावरून काढून टाकण्यात आले आहे.
या घटनेनंतर घिवली गावातील भूमिपुत्र असलेल्या व एचसीसीमध्ये काम करणाºया सर्व कंत्राटी कामगारांनी बुधवारपासून कामबंद आंदोलन सुरू केले आहे. यासंदर्भात पालघरच्या जिल्हाधिकाºयांकडेही बैठक झाली. खासदार राजेंद्र गावित यांनी बोईसर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी विश्वास वळवी यांच्या कार्यालयात हिंदुस्थान कन्स्ट्रक्शन कंपनीचे अधिकारी संतोष कुमार व संजय गोरे यांच्यासोबत बैठक घेतली. या वेळी तारापूर पोलीस स्थानकाचे स. पोलीस निरीक्षक जाधव, शिवसेनेचे पालघर विधानसभेचे संघटक वैभव संखे, शिवसेनेचे देवा मेहेर व काही सेना पदाधिकारी उपस्थित होते.
या वेळी खा. गावितांनी हिंदुस्थान कन्स्ट्रक्शन कंपनीच्या अधिकाºयांना तुम्ही असे कुठल्याही कामगारांना कामावरून काढू शकत नाही, असे सांगून अकुशल कामगारांना सुधारण्याची संधी द्या व संधी देऊनही सुधारत नसतील तर काढून टाका, जर संधी दिली गेली नाही तर प्रोजेक्ट बंद करून जावे लागेल, असा इशारा गावित यांनी दिला. तडकाफडकी काढलेले हे कामगार ४ वर्ष लायक होते का? असे गावितांनी विचारून आपणाला हा प्रश्न सोडवायचा आहे की रेंगाळत ठेवायचा आहे, असा प्रश्न करून कायदा व सुव्यवस्था बिघडू देऊ नका, असे सांगितले. मालकाला बैठकीला बोलवा, अशी मागणी गावितांनी अधिकाºयांकडे करताच ते बैठकीला येऊ शकत नाहीत, असे त्यांनी सांगताच या भागातील लोकप्रतिनिधी या नात्याने चर्चा करण्यासाठी मालकाला यावेच लागेल, असे खडसावून सांगितले.
>बीएआरसीमध्ये कोणत्याही कंत्राटदाराकडे काम करणाºया कामगारांचे पास जर जमा करायचे असतील तर ते पास प्रथम कंत्राटदार कंपनीने स्वत:कडे घेऊन बीएआरसी प्रशासनाच्या मान्यतेनंतर सीआयएसएफकडे रद्द करण्यासाठी देणे आवश्यक आहे असा नियम आहे, परंतु या प्रकरणात सीआयएसएफने परस्पर आपल्या हातात कामगारांची यादी घेऊन सकाळी कामावर जात असताना कामगारांकडून गेटपास जबरदस्तीने घेतले हे अन्यायकारक आहे. - वैभव मोरे, उपसरपंच, घिवली