‘तुम्ही येथून गेला नाहीत, तर गोळ्या घालू!’; पोलिसांचा खलाशांना दम

By ऑनलाइन लोकमत | Published: April 7, 2020 06:16 AM2020-04-07T06:16:23+5:302020-04-07T06:16:43+5:30

स्थानिकांकडून दगडफेक, पोलिसांनी कापले ट्रॉलर्सचे दोरखंड

'If you don't go here, shoot you; police warn sailors | ‘तुम्ही येथून गेला नाहीत, तर गोळ्या घालू!’; पोलिसांचा खलाशांना दम

‘तुम्ही येथून गेला नाहीत, तर गोळ्या घालू!’; पोलिसांचा खलाशांना दम

Next

हितेन नाईक ।
लोकमत न्यूज नेटवर्क
पालघर : गुजरातमध्ये अडकलेल्या जिल्ह्यातील सुमारे ५५० खलाशी कामगारांना कुणी वालीच उरलेला नाही. रात्रीच्या अंधारात गुजरातच्या स्थानिकांकडून ट्रॉलर्सवर अमानुषपणे दगडफेक केली गेली, तर त्या ट्रॉलर्सचे दोरखंड पोलिसांनी कापून त्यांना पुन्हा भुकेलेल्या अवस्थेत माघारी वेरावल बंदरात हाकलून लावले. ‘तुम्ही येथून गेला नाही, तर गोळ्या घालू’ असा दमही पोलिसांनी भरल्याचे एका कामगाराने सांगितले.
पोरबंदर, ओखा, वेरावल आदी गुजरातच्या विविध बंदरांतून ७ महिन्याच्या कालावधीनंतर आपल्या घरी परतण्यासाठी सुमारे १ हजार ८०० खलाशी उंबरगाव येथे आल्यानंतर रविवारी फक्त गुजरात, दमण व सेलवासा येथील खलाशांना ट्रॉलर्सवरून उतरविण्यात आले. त्यानंतर त्यांची आरोग्य तपासणी करून घरी पाठवण्यात आले. परंतु महाराष्ट्रातील खलाशांना उतरवण्यास गुजरात सरकार व पोलिसांनी नकार देत त्यांना जबरदस्तीने ट्रॉलर्सवर रोखले. ‘लोकमत’ने पालकमंत्री दादासाहेब भुसे यांना मोबाईल, स्वीय सचिव, मेसेजद्वारे अनेक वेळा प्रयत्न करूनही त्यांनी प्रतिसाद दिला नाही. खासदार राजेंद्र गावित, आमदार हितेंद्र ठाकूर, आ. रवींद्र फाटक, जिल्हाधिकारी डॉ.क्कैलास शिंदे आदींशी संपर्क साधून जिल्ह्यातील ५५० खलाशांच्या सुटकेसाठी प्रयत्न करण्याबाबत वारंवार कळवूनही स्थानिक कामगारांना आणण्यासाठी सर्वांना अपयश आले. मोठ्या आशेने हे कामगार लोकप्रतिनिधी व प्रशासन आपल्यासाठी काहीतरी करतील अशी वाट पाहत होते. मात्र रात्री उशिरापर्यंत त्यांना दिलासा देणारा निर्णय न आल्याने त्यांचे मनोधैर्य खचले होते. यादरम्यान २-३ कामगारांना फिटही आल्याने बेशुद्धावस्थेतील कामगारांना योग्य उपचारही गुजरातच्या आरोग्य विभागाकडून न मिळाल्याने कांदा फोडून त्यांच्या नाकाला लावून त्यांना शुद्धीवर आणण्यात आल्याची माहिती एका कामगाराने आपल्या मोबाईलवरून स्थानिकांना दिली.

पालकमंत्री ‘नॉट रिचेबल’
पालघर जिल्ह्याला उशिराने भेट देणाऱ्या कृषिमंत्री तथा पालघरचे पालकमंत्री दादा भुसे यांच्या लेटलतीफ कारभाराचा फटका या कामगारांनाही बसला. त्यांना रविवारी कॉल करून मेसेज टाकून त्यांच्या सचिवांशी बोलून परिस्थितीचे गांभीर्य समजावूनही त्यांनी व्यवस्थेविषयी सकारात्मक निर्णय घेतला नाही. सोमवारी वसई येथे पालक मंत्र्यांशी मोबाइलवरून या परिस्थितीबाबत बोलण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांच्या सचिवांनी हा प्रयत्न यशस्वी होऊ दिला नाही.
आज अन्य राज्यातून पालघर जिल्ह्यात रोजगारासाठी आलेल्या १५ ते २० हजार कामगारांच्या राहण्याचा, आरोग्य तपासणीचा, जेवणाचा खर्च मागील अनेक दिवसांपासून राज्य सरकार आणि जिल्हा प्रशासन उचलीत असताना ७ महिन्यांपासून कुटुंबापासून लांब असलेल्या आणि आपल्या घरापासून १० ते १२ किमी अंतरावर थांबलेल्या ५५० स्थानिक कामगारांसाठी पालकमंत्री काहीही उपाययोजना आखू न शकल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे.

Web Title: 'If you don't go here, shoot you; police warn sailors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Gujaratगुजरात