पोलीस प्रशासनाचे सट्टा बुकींकडे दुर्लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2018 06:05 AM2018-11-17T06:05:59+5:302018-11-17T06:06:34+5:30
कोट्यवधीची उलाढाल : तरुणाई वेठीस
शौकत शेख
डहाणू : जिल्हा पोलीस अधीक्षक गौरवसिंग यांनी दंडूका उचलल्याने जिल्हाभरातील रेती, गुटखा, जुगार, मटका तसेच दमण दारू माफियांवर सातत्याने कारवाई सुरू झाली आहे. यामुळे अवैद्य धंदे वाल्याचे कंबरडे मोडले असले तरी डहाणूतील क्रिकेट सट्टा बुकी अद्यापही मोकाट असल्याने येथील तरुणाई भरडली जात आहे.
डहाणूमध्ये दररोज कोट्यवधींचा सट्टा खेळला जात असून या बेकायदेशीर जुगारात कोट्यवधींची उलाढाल होत आहे. विशेष म्हणजे याबाबतीत पोलिसांना देखील सट्टा घेणाऱ्या बुकीची माहिती असतांना कारवाई होत नसल्याने क्रिकेटवर सट्टा खेळणाºया ग्राहकांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यामुळे डहाणूतील असंख्य सुशिक्षित बेरोजगार तरुण, माजी नगरसेवक, शिक्षक, कारखानेदार तसेच अनेक मोठेमोठे व्यापारी त्यास बळी पडत आहेत. सध्या इंटरशॅलनल सिरीज तसेच वनडे मॅच देशभरात फिवर असून त्याच्यावर मोठ्या प्रमाणात जुगार खेळला जात आहे. काही बुकी मोबाईलवर प्रत्येक चेंडूचे सेशन ग्राहकांना सांगतात. तर काहींनी नावाची आयडी बनविली आहे. त्यावर मोठ्या प्रमाणातील तरुण दररोज लाखोचा सट्टा खेळत आहे.
आम्ही यापूर्वी कारवाई केलेली आहे. आणि पुढेही तपास करून कारवाई करीत राहु.
- योगेश चव्हाण, अतिरिक्त
पोलीस अधीक्षक, पालघर