घोलवड, बोर्डी रोड रेल्वे स्थानके दुर्लक्षित
By admin | Published: July 10, 2015 10:27 PM2015-07-10T22:27:26+5:302015-07-10T22:27:26+5:30
महाराष्ट्र-गुजरात सीमेवरील पालघर जिल्ह्यातील घोलवड आणि बोर्डी रोड रेल्वे स्थानकांत समस्यांचा विळखा दिवसेंदिवस अधिकच घट्ट होत चालला आहे
बोर्डी : महाराष्ट्र-गुजरात सीमेवरील पालघर जिल्ह्यातील घोलवड आणि बोर्डी रोड रेल्वे स्थानकांत समस्यांचा विळखा दिवसेंदिवस अधिकच घट्ट होत चालला आहे. पश्चिम रेल्वे प्रशासन, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या दुर्लक्षतेमुळे नागरिकांवर जीव गमावण्याची वेळ ओढवली आहे.
पश्चिम रेल्वेची घोलवड आणि बोर्डी रोड रेल्वे स्थानके भौतिक व पायाभूत सुविधांपासून वंचित आहेत. त्यामुळे प्रवाशांना शारीरिक, मानसिक त्रास होतो. बोर्डी रोड स्थानकात प्लॅटफॉर्म नाही. घोलवड स्थानकात प्लॅटफॉर्म आहेत, मात्र शेड नाही. अस्वच्छ शौचालयांमुळे परिसरात दुर्गंधी येते. स्थानकाच्या उभारणीत नियोजनशून्यता दिसते. कारण, प्लॅटफॉर्म क्र. १ अस्तित्वात नाही. जागेअभावी उभारणी करणे कठीण दिसते.
दिवसभरात एक एक्स्प्रेस गाडीला थांबा आहे. शटल, पॅसेंजर, मेमो गाड्यांमध्ये एक ते दीड तासाचे अंतर आहे. गाड्यांशी कनेक्टेड एसटी, आॅटो रिक्षा यांची संख्या मर्यादित असल्याचे हे महत्त्वाचे कारण आहे.
खेड्यापाड्यांतील प्रवासी वाहने मिळविण्याकरिता चालत्या गाडीतून उतरण्याची जोखीम घेतात. निम्म्यापेक्षा अधिक प्रवासी जिन्याचा वापर करीत नाहीत. लोखंडी पट्ट्यांच्या संरक्षक जाळीच्या पट्ट्या सरकवून शॉर्टकट मार्ग अवलंबतात.
परिसरातील ६१ व ६४ क्रमांकांचे रेल्वे गेट वर्दळीच्या रस्त्यांना जोडणारे आहेत.
गाड्यांना मार्गस्थ करतेवेळी ते बंद असतात. या वेळी विद्यार्थी, महिला, चाकरमानी जीवाची पर्वा न करता रेल्वे रूळ ओलांडतात. कार्यरत रेल्वे अधिकारी, कर्मचारी बघ्याची भूमिका घेतात.
नियम तोडणाऱ्यांवर त्यांचे कोणतेच नियंत्रण नाही. त्यामुळे अपघात घडून जीवितहानीची शक्यता नाकारता येत नाही. (वार्ताहर)