सर्पदंश झालेल्या विनीतकडे दुर्लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2018 11:08 PM2018-10-28T23:08:45+5:302018-10-28T23:09:03+5:30
शिक्षकांचा भयानक अमानुषपणा; उपचार करण्याऐवजी नातेवाइकांच्या स्वाधीन केले
- हितेन नाईक
पालघर : जिल्हापरिषदेच्या देवखोप शाळेत शिकणाऱ्या विनीत हडळ (इ.४थी) या आदिवासी विद्यार्थ्याच्या पायाला विषारी सापाने चावा घेतल्यानंतर त्याला रूग्णालयात दाखल करण्यासाठी एकही शिक्षक धावून आला नाही. त्याच्या नातेवाईकांनाच सारी धावपळ करावी लागली त्यांनीच त्याला आधी पालघरच्या ग्रामीण रुग्णालयात. व नंतर अधिक उपाचारासाठी त्याला सिल्व्हासा येथे नेले. शिक्षकांच्या ह्या असंवेदनशील प्रवृत्तीच्या विरोधात सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे.
पालघर-मनोर रस्त्यावरील देवखोप या आदिवासी बहुल भागात असणाºया जिल्हापरिषदेच्या प्राथमिक शाळेत गडग पाड्यातील विनीत हा चौथीत शिक्षण घेतो, तो शनिवारी शौचाला गेला असता पायाला सापाने दंश केला. तो काही वेळाने लंगडत चालू लागल्याचे विद्यार्थ्यांनी निदर्शनास आणून दिले. वास्तविक शिक्षकांनी चौकशी करून त्याला डॉक्टरांकडे घेऊन जाणे अपेक्षित असतांना त्यांनी सरळ नातेवाईकांना बोलावून त्याला त्यांच्या हवाली केले आणि आपली जबाबदारी झटकली.
विनीतच्या काकांनी त्याला उपचारासाठी पालघरच्या ग्रामीण रुग्णालयात आणले असता डॉ.दिनकर गावित यांनी त्याची तपासणी करून व अंगात भिनलेल्या विषाची मात्रा पाहून त्याच्यावर तात्काळ उपचार सुरू केले. मात्र त्याच्या शरीरात मोठ्या प्रमाणात विष पसरले होते. अनेक इंजेक्शन देऊनही विनीत उपचाराला हवा तसा प्रतिसाद देत नसल्याने डॉक्टरांनी त्याला मुंबई, अथवा अन्य ठिकाणच्या रुग्णालयात नेण्याचा सल्ला दिला. डॉ.गावितांशी बोलून अॅम्ब्युलन्स तयार ठेवली. सेनेचे तालुकाध्यक्ष विकास मोरे ह्याच्या कडे आर्थिक मदत मागितली असता ती मिळाली आणि विनीतच्या आईला नंडोरे येथील एका कारखान्यातून घेऊन अॅम्ब्युलन्स सिल्व्हासाकडे रवाना झाली. त्याच्यावर योग्य उपचार झाल्याने आता त्याची तब्येत सुधारत आहे.
सकाळी शाळेत आल्यानंतर साप चावल्याचे विनीत ने सांगितले. त्यामुळे त्याला त्याच्या नातेवाईकांच्या ताब्यात दिले.
-शेख, शिक्षिका