बेकायदा इमारतीला गेले तडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2019 11:57 PM2019-08-27T23:57:22+5:302019-08-27T23:58:07+5:30
सुरक्षिततेसाठी पालिका आयुक्त अशोककुमार रणखांब यांनी ही धोकादायक इमारत रिकामी करण्याची सूचना आपत्कालीन विभागाला दिली. त्यानुसार ४५ कुटुंबांना दुसरीकडे स्थलांतरीत केले आहे.
भिवंडी : शांतीनगर - पिराणीपाडा येथे चार मजली बेकायदा इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत दोन जणांचा मृत्यू तर सात जण जखमी झाल्याची घटना ताजी असतानाच याच शांतीनगर परिसरात असलेल्या मोमीन पुरा, खान कम्पाऊंड येथे असलेल्या तळ अधिक चार मजल्याच्या इमारतीच्या खांबाला तडे गेल्याने खळबळ उडाली आहे.
सुरक्षिततेसाठी पालिका आयुक्त अशोककुमार रणखांब यांनी ही धोकादायक इमारत रिकामी करण्याची सूचना आपत्कालीन विभागाला दिली. त्यानुसार ४५ कुटुंबांना दुसरीकडे स्थलांतरीत केले आहे.
ही बेकायदा इमारत अय्याज मोमीन नावाच्या विकासकाची असून ही इमारत १५ वर्षांपूर्वी बांधली आहे. इमारतीचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे असल्याने गेल्यावर्षी महापालिकेने या इमारतीस धोकादायक ठरवत नोटिसही बजावली असल्याची माहिती मिळत आहे. धोकादायक इमारतींमुळे येथील नागरिकांचा जीव टांगणीला लागला आहे. तसेच भीतीचे वातावरणही आहे.
ही इमारत बेकायदा असून कोणतीही दुर्घटना होऊ नये म्हणून ती रिकामी करण्यात आली आहे.
- अशोककुमार रणखांब, आयुक्त