गायींची अवैध वाहतूक करणारे अटकेत
By admin | Published: February 21, 2017 05:13 AM2017-02-21T05:13:19+5:302017-02-21T05:13:19+5:30
गायींची अवैध वाहतूक केल्याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. या गायी शहापूर येथून आणण्यात आल्या होत्या
वसई : गायींची अवैध वाहतूक केल्याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. या गायी शहापूर येथून आणण्यात आल्या होत्या. तसेच नालासोपारा येथील एका बेकायदा कत्तलखान्यात विकल्या जाणार होत्या, अशी प्राथमिक माहिती तपासात उजेडात आली आहे.
वज्रेश्वरी रोडवरुन शिरसाड दिशेने गायींची वाहतूक होणार असल्याची माहिती मिळताच बजरंग दल, विश्व हिंंदू परिषद व भारतीय गोवंश रक्षण संवर्धन परिषदेच्या नालासोपारा येथील कार्यकर्त्यांनी मांडवी पोलिसांत धाव घेतली होती. त्यानंतर मांडवी पोलिसांनी सहा गायींची बेकायदा वाहतूक करणारा टेम्पो ताब्यात घेतला होता. पोलिसांनी याप्रकरणी वसईतील भुईगाव येथील सचिन जनार्दन नाईक (२८) आणि गणेशपुरी येथील पांडू माया भोईर यांनी अटक करून टेम्पो जप्त केला आहे. या गायी शहापूर, खर्डी या भागातून वाहनात भरुन नालासोपारा पश्चिमेतील वाझा मोहल्यामधील शरिफ काझी व नझीर शेख यांच्याकडे कत्तलीसाठी पोचवण्यात येणार होती, अशी माहिती पोलिसांना चौकशी दरम्यान मिळाली आहे. या गायी सकवार येथील जीवदया मंडळाच्या गो शाळेत दिली असून या दोन आरोपीवर गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे. (वार्ताहर)