"ई-फेरफार संगणक प्रणालीचे राज्य समन्वयक तथा उपजिल्हाधिकारी रामदास जगताप यांची तात्काळ बदली करा"
By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2021 02:27 PM2021-10-13T14:27:57+5:302021-10-13T14:30:26+5:30
Vasai News : पालघर जिल्ह्यातील पालघर, डहाणू, तलासरी, जव्हार, वाडा ,विक्रमगड , मोखाडा आणि वसई तालुक्यात हे निषेध आंदोलन जोरदार सुरु असून त्यामुळे सर्वसामान्य शेतकरी वर्गाची कामे खोळंबली आहेत.
आशिष राणे
वसई - डीएलआरएमपी' या डिजिटल प्रणालीचे राज्य समन्वयक तथा पुणे उप-जिल्हाधिकारी रामदास जगताप यांनी असंविधानिक भाषेचा वापर केल्याचा आरोप तलाठी संघटनांनी केला आहे. याचा राज्यासह वसई तालूका तलाठी संघ व मंडळ अधिकारी संघटनेकडून तीव्र निषेध करण्यात आला आहे. दरम्यान मागील आठवड्यापासून राज्य तलाठी संघटनेकडून हे आंदोलन पुकारण्यात आले आहे. सुरुवातीला काळया फिती नंतर धरणे आंदोलन नंतर सोमवारी सर्व तलाठी व मंडळ अधिकारी वर्ग आपल्या डीएसी तहसीलदार यांना सुपूर्द करणार आणि याचीही दखल न घेतल्यास बुधवार पासून हे आंदोलन अधिक तीव्र करू असा इशारा संघटनेने दिला आहे.
परिणामी मंगळवारी तांत्रिक कामासाठी वापरल्या जाणााऱ्या 'डीएसी' वसईतील सर्व तलाठी व मंडळ अधिकारी वर्गांनी वसई तहसीलदार उज्वला भगत यांच्याकडे जमा केल्या असून याखेरीज आम्ही केवळ नैसर्गिक आपत्तीची कामे सुरू ठेवणार आहोत अशी माहिती वसई तालुका तलाठी संघटनेच्या विद्यमान सचिव जानव्ही मोरे यांनी लोकमतला दिली.
पालघर जिल्ह्यातील पालघर, डहाणू, तलासरी, जव्हार, वाडा ,विक्रमगड , मोखाडा आणि वसई तालुक्यात हे निषेध आंदोलन जोरदार सुरु असून त्यामुळे सर्वसामान्य शेतकरी वर्गाची कामे खोळंबली आहेत. उपजिल्हाधिकारी रामदास जगताप यांची तात्काळ बदली करण्यात यावी यासाठी हे राज्यभर आंदोलन सुरु करण्यात आले आहे.
तलाठी कर्मचारी संघटनेचे राज्याचे अध्यक्ष ज्ञानदेव डुबल यांनी दिलेल्या निवेदनावरुन उपजिल्हाधिकारी जगताप यांनी शासकीय सोशल ग्रूपवर चूकीची भाषा वापरली होती त्याचा तीव्र निषेध म्हणून हे आंदोलन राज्यभर सुरू करण्यात आले आहे. शेतकऱ्यांच्या अडचणी कमी करा अशी ही मागणी तलाठी संघाने केली आहे. किंबहुना ई पीक पाहणी एप मधील ग्रामीण भागात शेतकऱ्यांना येत असलेल्या अडी-अडचणी, तांत्रिक दोष काढून टाकावे, ई-फेरफार मध्ये येत असलेल्या काही तांत्रिक समस्याही तात्काळ दूर कराव्यात अशी मागणीही वसई तालुका मंडळ अधिकारी व तलाठी कर्मचारी संघटनेकडून करण्यात आली आहे.