महावितरणच्या हलगर्जीमुळे निष्पाप बालकाचा मृत्यू; डीपी बॉक्सला स्पर्श झाल्याने अनर्थ घडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2024 05:11 PM2024-06-28T17:11:16+5:302024-06-28T17:14:33+5:30
महावितरणच्या हलगर्जी कारभारामुळे निष्पाप नागरिकांचा बळी गेल्याची घटना वसईकरांसाठी नवीन नाही.
नालासोपारा (मंगेश कराळे) :-महावितरणच्या हलगर्जी कारभारामुळे निष्पाप नागरिकांचा बळी गेल्याची घटना वसईकरांसाठी नवीन नाही. यापूर्वी अशा अनेक घटना घडलेल्या आहेत. गुरुवारी वसईतील भास्कर आळी नजीक नऊ वर्षाच्या मुलाचा असाच मृत्यू झाला आहे. या अपघातास महावितरणचे अधिकारी कारणीभूत असल्याने त्यांच्यावर दोषारोप पत्र दाखल करून त्यांना निलंबित करण्यात यावे अशी वसईकरांनी मागणी केली आहे.
वसई गावातील श्रीनगर संकुल येथे राहणारे सिराज शेख यांचा मुलगा मोहम्मद जियाद सिराजुद्दीन शेख उर्फ बिलाल (९) याचा मृत्यू झाला आहे. धुरी कॉम्प्लेक्स डिसोजा हॉस्पिटलच्या मागे सदरची घटना घडली आहे. या रस्त्यावर महावितरणचा डीपी बॉक्स आहे. सदर मुलगा या ठिकाणी सायकलवर खेळत असताना या डीपी बॉक्सला स्पर्श झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. संध्याकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. याबाबत वसई पोलीस ठाण्यामध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मृत मुलाचे वडील सौदी अरेबिया येथे कार्यरत आहेत. घटनेनंतर तात्काळ त्यांनी वसई गाठली. शुक्रवारी दुपारी हत्ती मोहल्ला मस्जीद कब्रस्तानात पार्थिवावर अंतिम संस्कार करण्यात आले.
पावसाळ्यापूर्वी तब्बल अनेक तासांचे शट डाऊन करून वीज दुरुस्त्या केल्या जातात. विज व्यवस्था निर्धोक, सुरळीत राहील असा दावा केला जातो. प्रत्यक्षात तक्रारी देऊनही योग्य कारवाई केली जात नाही. त्यामुळे नागरीकांना जीव मुठीत घेऊन वावरावे लागत आहे. अशा पद्धतीच्या घटना घडण्याची शक्यता लक्षात घेऊन महावितरणने शहरात उघड्यावर असलेल्या वीजतारांबाबत काळजी घ्यावी, अशी मागणी राजकीय पक्ष, सामाजिक संघटना व सामान्य नागरिक यांच्याकडून सातत्याने होत होती. परंतु महावितरणच्या अधिकाऱ्यांनी या मागणीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले. किंबहुना त्यात हलगर्जी दाखवली आहे.
विशेष म्हणजे; मागील वर्षी विरार येथे एका विद्यार्थिनीचा; प्रगती नगर येथे एका पादचाऱ्याचा, भोईदापाडा येथे एका महिलेचा अशाच पद्धतीने बळी गेला होता. तर या वर्षीच्या पावसाळ्याच्या सुरुवातीला आचोळे येथे एका युवकाचा मृत्यू झाला आहे. त्यानंतर आता महावितरच्या हलगर्जीपणामुळे बिलाल शेख याचा मृत्यू ओढवला आहे. महावितरणने तातडीची मदत म्हणून २० हजार रुपयांची मदत मुलाच्या वडिलांना दिली आहे.
१) सदरचा मुलगा येथून सायकलवरून जात असताना या डीपी बॉक्सवर पडला. सदर डीपीच्या केबलना स्पर्श झाल्याने ही घटना घडली असावी असा प्राथमिक अंदाज आहे. विद्युत निरीक्षक स्थळ पाहणी करून अहवाल सादर करतील. त्यानुसार पुढील कारवाई केली जाईल. - प्रवीण सुटे, (उपकार्यकारी अभियंता, वसई)