पोलिसांच्या ताब्यातून पळालेले दोन्ही आरोपी अटक; एसटीएफ आणि नालासोपारा पोलिसांची कामगिरी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2024 03:56 PM2024-07-06T15:56:03+5:302024-07-06T15:58:38+5:30
पोलिसांच्या ताब्यातून पळालेले दोन्ही आरोपींना एसटीएफ आणि नालासोपारा पोलिसांनी यूपीच्या प्रतापगढ मधून ताब्यात घेत अटक केली आहे.
नालासोपारा (मंगेश कराळे) :-पोलिसांच्या ताब्यातून पळालेले दोन्ही आरोपींना एसटीएफ आणि नालासोपारापोलिसांनी यूपीच्या प्रतापगढ मधून ताब्यात घेत अटक केली आहे. यूपीच्या इटावा रेल्वे स्थानकात पोलिसांना गुंगारा देऊन तीन आरोपी रेल्वेमधून पळून गेले होते. त्यावेळी एकाला अटक केले होते तर हे दोघे फरार होते.
मोहम्मद अनीस रफिक, मोहम्मद रेहान फारुकी आणि कलीम अहमद या तीन आरोपींविरोधात नालासोपारा पोलीस ठाण्यात फसवणूकीसह गुन्हा दाखल होता. नालासोपारा पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक मिलिंद तायडे आणि हर्षल राऊत यांच्या नेतृत्वाखालील पोलीस पथकाने उत्तरप्रदेशातील प्रतापगड जिल्ह्यातून या आरोपींना अटक केली होती. त्यांना स्थानिक न्यायालयातून ट्रान्झिट रिमांड घेऊन नालासोपारा येथे आणले जात होते. गाझीपूर वांद्रे एक्स्प्रेस गाडीतून पोलीस पथक आरोपींसह येत होते. १७ जूनला पहाटे साडेपाचच्या सुमारास इटावा स्थानकापूर्वी इकदिल स्थानकावरून ट्रेन जात असताना, तीन आरोपींनी पोलिसांना धक्काबुक्की केली आणि हातकडीसह चालत्या ट्रेनमधून उडी मारून पळ काढला होता. इटावा स्थानकात ट्रेन थांबल्यावर नालासोपारा पोलिसांनी घटनेची माहिती इटावा रेल्वे पोलिसांना दिली. या नंतर फरार आरोपींचा शोध सुरू करण्यात आला. यातील मोहम्मद अनीस रफिक या आरोपीला अटक करण्यात आली होती. यूपीच्या एसटीएफ आणि नालासोपारा पोलिसांनी १ जुलैला मोहम्मद रेहान फारुकी आणि कलीम अहमद या दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले. त्यानंतर स्थानिक न्यायालयातून ट्रान्झिट रिमांड घेऊन आरोपींना नालासोपाऱ्यात घेऊन आले.
१) दोन्ही आरोपींबाबत एसटीएफला पूर्ण नावे व माहिती देऊन गुन्हा दाखल केला होता. पळून गेलेल्या दोन्ही आरोपींना शुक्रवारी वसई न्यायालयात हजर केल्यावर १० जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. - विजयसिंह बागल, (वरिष्ठ पोलीस निरीक्षक, नालासोपारा पोलीस ठाणे)