स्वस्तात घरे देण्याची जाहिरात देऊन अनेकांची फसवणूक; चाळ माफियाला माणिकपूर पोलिसांकडून अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2024 03:52 PM2024-07-04T15:52:53+5:302024-07-04T15:54:06+5:30
माणिकपुर गुन्हे प्रकटीकरण पथकाच्या पोलिसांना यश मिळाल्याची माहिती पोलीस निरीक्षक अभिजित मडके यांनी गुरुवारी दिली आहे.
नालासोपारा (मंगेश कराळे) :- वसई विरार परिसरातील चाळीमध्ये नागरिकांना स्वस्तात रुम मिळवून देण्याचे आमिष दाखवून नागरिकांकडून १ कोटी १५ लाख रुपये उकळणाऱ्या चाळ माफिया आरोपीला अटक करण्यात माणिकपुर गुन्हे प्रकटीकरण पथकाच्या पोलिसांना यश मिळाल्याची माहिती पोलीस निरीक्षक अभिजित मडके यांनी गुरुवारी दिली आहे.
वाघराळ पाड्यातील गौशाळा आश्रम याठिकाणी राहणाऱ्या गणेश तापेकर (४१) आणि इतर साक्षीदारांची २५ ऑगस्ट २०२० ते १५ मार्च २०२४ दरम्यान फसवणूक झाली आहे. आरोपी चाळ माफियाने चाळीमध्ये घर बांधून देतो असे सांगून ७ लाख रुपये बँक खात्यावर घेतले. यानंतर रूमही नाही व घेतलेले पैसेही परत न करता फसवणूक केली. याप्रकरणी माणिकपूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. हा गुन्हा दाखल झाल्यापासून गुन्ह्यातील मुख्य आरोपी फरार होता. आतापर्यंत ३५ हून अधिक जणांनी त्याच्या विरोधात तक्रारी दिल्या आहेत. सदर आरोपीचा शोध घेण्यासाठी वरिष्ठांनी दिलेल्या सूचना व मार्गदर्शनाप्रमाणे माणिकपुर गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अधिकारी व अंमलदारांनी आरोपी दीपक सिंग याचे मोबाईल क्रमांकाचे तांत्रिक विश्लेषणाद्वारे शोध घेतल्यावर आरोपी हा नायगांव पूर्व परिसरात मिळूण आल्याने त्याला ताब्यात घेऊन अटक करण्यात आली आहे.
आरोपी दिपक सिंग हा रेल्वे स्थानक परिसरात फसव्या जाहिराती देऊन लोकांचा दिशाभूल करत होता. आपली जागा असल्याचे भासवून चाळ बांधून देण्याचे आमिष लोकांना देत होता. मात्र त्यांच्याकडून पैसे उकळून त्यांची आर्थिक फसवणकू करत होता. पोलिसांनी दिपक सिंगच्या विरोधात फसवणूक आणि महाराष्ट्र ठेवीदारांच्या हितसंबंधाचे संरक्षण अधिनियम (एमपीआयडी) अंतर्गत गुन्हे दाखल केले होते. सोमवारी दिपक सिंग तसेच त्याच्या एका साथीदाराला नालासोपाऱ्यातून अटक केली आहे. ज्या कुणाला या आरोपींनी फसवणूक केली असेल त्यांनी माणिकपूर पोलीस ठाण्याशी संपर्क करावा असे आवाहनही पोलिसांनी केले आहे.
१) आरोपी हा चाळ माफिया असून चाळी बांधून देतो, स्वस्तात घरे देतो असे सांगून त्याने अनेकांची फसवणूक केली आहे. यासाठी दिशाभूल करणार्या खोट्या जाहिराती देत होता. मुख्य आरोपी दीपक आणि त्याचा साथीदार सध्या पोलीस कोठडीत असून गुन्ह्याचा तपास सुरू आहे. - राजू माने, (वरिष्ठ पोलीस निरीक्षक, माणिकपूर पोलीस ठाणे)