अतिक्रमण हटविले नसल्याच्या निषेधार्थ ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीसमोरच केले अंत्यसंस्कार
By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2022 07:13 PM2022-11-11T19:13:27+5:302022-11-11T19:13:49+5:30
अतिक्रमण हटविले नसल्याच्या निषेधार्थ ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीसमोरच अंत्यसंस्कार केले आहे.
(हितेंन नाईक)
पालघर : दांडाखाडी गाव परिसरातील पारंपरिक स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता व त्या भागातील सरकारी जागेवर केलेले अतिक्रमण हटविण्याचे आदेश तहसीलदारांनी देऊनही ते हटविण्यात ग्रामपंचायत चालढकल करीत असल्याच्या निषेधार्थ गावातील एका व्यक्तीचे अंत्यसंस्कार ग्रामपंचायत कार्यालयासमोरच करून ग्रामस्थांनी आपला निषेध व्यक्त केला. केळवे गावाच्या दक्षिणेला असलेल्या दांडा खटाळी गावातील सर्व्हे न ३ या आकारिपडीत सरकारी जागेवर बेकाधीश रित्या वीस गुंठे जागेवर अनधिकृत पणे केलेले कंपाऊंड निष्कासित करावे, पाण्याचा नैसर्गिक ओहोळ खुला करावा, आणि स्मशान भूमी खुली करावी अशी तक्रार दांडाखटाळीचे ग्रामस्थ रामचंद्र नारायण दांडेकर यांनी पंतप्रधान आणि महसूल विभागाकडे 21 डिसेंबर 2021 रोजी केली होती.
या तक्रारीच्या अनुषंगाने तहसीलदार सुनील शिंदे यांनी ७ जुलै 2022 रोजी सुनावणी घेतली होती. या सुनावणीत तक्रारदारांनी झालेली अतिक्रमण बाबत पुरावा सकट बाब निदर्शनास आणून दिली होती. त्यामुळे सदर अतिक्रमण दूर करावे व केलेल्या कार्यवाहीचा अहवाल या कार्यालयात सादर करावा असे आदेश तहसीलदारांनी ग्रामसेवकाला पत्र पाठवून दिले होते. जागा गावठाण व गुरुचरण असल्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार महसूल वन विभागाकडील शासन निर्णय क्रमांक जमीन ०३/२०११ प्र.क्र५३ मधील तरतुदीनुसार सदर जागेचे संवर्धन करणे जबाबदारी संबंधित स्थानिक ग्रामपंचायती असल्याचे आदेशात म्हटले होते. ह्या भागात अनेक वर्षांपासून गावात असलेल्या स्मशानभूमी एखादा मृत्यू झाल्यानंतर त्यांच्यावर अंत्यसंस्कार गेल्या अनेक वर्षांपासून केला जातो. मात्र तक्रार केल्या नंतर तहसीलदारांच्या आदेशा नंतर ही ग्रामसेवकानी हे अतिक्रमण हटविले नसल्याच्या निषेधार्थ ग्रामस्थांनी दांडाखाडी येथील बारी समाजाचे आशिष नारायण बारी (50) ह्या व्यक्तीच्या मृतदेहावर ग्रामपंचायतीच्या समोरच अंत्यसंस्कार करीत आपला रोष व्यक्त केला.