वसईत ३० लाख लोकांचा भार चार रुग्णालयांवर; तज्ज्ञ डॉक्टरांचा अभाव, रुग्णांची फरफट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2023 11:03 AM2023-08-16T11:03:17+5:302023-08-16T11:04:06+5:30

नगीनदास पाड्यातील तुळींज रुग्णालयात ‘लोकमत’ने भेट देऊन रुग्णांच्या सोयी- सुविधा पुरेशा आहेत का, याचा आढावा घेतला.

in vasai 3 lakh people are burdened at four hospitals lack of specialist doctors patients are at risk | वसईत ३० लाख लोकांचा भार चार रुग्णालयांवर; तज्ज्ञ डॉक्टरांचा अभाव, रुग्णांची फरफट

वसईत ३० लाख लोकांचा भार चार रुग्णालयांवर; तज्ज्ञ डॉक्टरांचा अभाव, रुग्णांची फरफट

googlenewsNext

मंगेश कराळे, लोकमत न्यूज नेटवर्क, नालासोपारा : वसईविरार महापालिका हद्दीत सुमारे ३० लाख लोकसंख्या असून महापालिकेची अवघी चार रुग्णालये आहेत. त्यातही तज्ज्ञ डाॅक्टरांचा अभाव असल्याने रुग्ण आणि नातेवाइकांची फरफट होत आहे.

महापालिकेची सर डी. एम. पेटिट, तुळींज ग्रामीण रुग्णालय, सोपारा रुग्णालय आणि श्री जीवदानी अशी चार रुग्णालये आहेत. यातील नगीनदास पाड्यातील तुळींज रुग्णालयात ‘लोकमत’ने भेट देऊन रुग्णांच्या सोयी- सुविधा पुरेशा आहेत का, याचा आढावा घेतला. मनपा रुग्णालयात सामान्य, गरीब रुग्णांना सेवा देण्यात प्रशासनाची उदासीनता आहे. येथे डॉक्टरांची कमतरता आहे. प्रधानमंत्री भारतीय जनऔषधी केंद्रांमध्ये औषधांचा तुटवडा आहे. या रुग्णालयात एमबीबीएस डॉक्टर आणि उपचारासाठी महत्त्वाची उपकरणे अजून मिळाली नाहीत. 

मनपाच्या स्थापनपासून म्हणजे १५ वर्षे झाली तरी भूलतज्ज्ञ डॉक्टरचे पद अद्यापही रिक्त आहे. आवश्यक तपासणी उपकरणांचीही वानवा आहे. रात्रीच्या वेळी तर रुग्णांना मोठा त्रास सहन करावा लागतो. येथील कर्मचारी उद्धट पद्धतीने रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांशी बोलतात. रात्रीच्या वेळी डॉक्टर कमी असल्याने रांग लावून डॉक्टरकडे उपचारासाठी जावे लागते.

मनपाकडे अवघ्या  सात रुग्णवाहिका  
 
वसई-विरार शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे नागरिकांचा आरोग्याचा प्रश्नही मोठा आहे. मनपाकडे सध्या सात रुग्णवाहिका आहेत. खासगी आणि स्वयंसेवी संस्थांच्या रुग्णवाहिकेकडून पैसे उकळले जात असल्याचा आरोप नागरिक करतात. समाजसेवा करणारे ट्रस्टचे चालक रुग्णांच्या नातेवाइकांकडून पैसे उकळत असल्याचा आरोपही अनेकांनी केला.

 

Web Title: in vasai 3 lakh people are burdened at four hospitals lack of specialist doctors patients are at risk

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.