रस्त्यांच्या अर्धवट कामांमुळे अपघातांत वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2021 12:42 AM2021-03-11T00:42:43+5:302021-03-11T00:43:22+5:30
भिवंडी-वाडा-मनाेर रस्त्यावर चालकांची कसरत
लोकमत न्यूज नेटवर्क
वाडा : भिवंडी-वाडा-मनोर हा रस्ता पूर्णपणे खड्ड्यांत गेला आहे. रस्त्यावर माेठमाेठे खड्डे पडल्याने अवजड वाहने उलटण्याचे प्रमाण वाढले आहेत. यामुळे वाहनमालकांचे प्रचंड नुकसान होत आहे. भिवंडी-वाडा-मनोर हा रस्ता बांधा वापरा व हस्तांतरित करा, या तत्त्वावर शासनाने सुप्रीम कंपनीला २०११ मध्ये दिला होता. दोन महिन्यांचा कालावधी या कामासाठी दिला होता. मात्र, दहा वर्षांचा कालावधी उलटूनही रस्त्याचे काम पूर्ण होऊ शकलेले नाही.
पिंजाळ व देहर्जे या नद्यांवरील पुलांची कामे अपूर्ण अवस्थेत आहेत. तर वनविभागाच्या १६ किमी अंतराचा रस्ता अद्याप दुपदरीच आहे. वाडा ते अंबाडी यादरम्यानच्या रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याने हा रस्ता प्रत्येक पावसाळ्यात खड्ड्यात जातो. त्यानंतर रस्त्याची डागडुजी केली जाते. मात्र, रस्ते सतत खड्ड्यात जात असल्यामुळे हा रस्ता पुन्हा सुप्रीम कंपनीकडून काढून सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग करण्यात आला आहे.
या रस्त्याची प्रचंड दुरवस्था झाली असून काही ठिकाणी तर डांबर बघावयास मिळत नाही. कुडूसनजीक कंचाड फाटा येथे रस्ता एका बाजूने सिमेंट काँक्रिटीकरणाचा आहे. तर दुसऱ्या बाजूने डांबरीकरणाचा आहे. त्यामुळे सिमेंट क्राँक्रिटीकरण व डांबरीकरण यामधील अंतर एक ते दीड फूट अंतराचे असल्याने येथे गाड्या घसरून उलटत आहेत.
सिमेंट काँक्रिटीकरणाच्या बाजूला मातीचा भराव न टाकल्याने खोल भाग झाला आहे. एक आठवड्यापूर्वी एक कंटेनर येथेच उलटला होता. तर रात्री पुन्हा एक कंटेनर उलटला आहे. या अपघातामुळे वाहनांचे नुकसान होत असल्याने नाराजी व्यक्त हाेत आहे.
भिवंडी-वाडा महामार्गावरील कंचाड फाटा येथील अपूर्ण काम येत्या आठ दिवसांत सुरू करण्यात येईल.
- अनिल बरसट, उपअभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, वाडा