वीज बील भरणा केंद्रे वाढवा; डहाणूतील किनाऱ्यालगतच्या ग्राहकांची मोठी गैरसोय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2018 05:04 AM2018-07-04T05:04:53+5:302018-07-04T05:05:02+5:30
डहाणू किनारपट्टी भागामध्ये वीज बील भरणा केंद्राची वानवा असल्याने तासंतास रांगेत उभे राहावे लागते. महावितरणने तत्काळ नवीन केंद्र उघडावे अन्यथा आंदोलनाचा सामना करावा असा पवित्रा किनारपट्टी भागातील ग्राहकांनी घेतला आहे.
बोर्डी : डहाणू किनारपट्टी भागामध्ये वीज बील भरणा केंद्राची वानवा असल्याने तासंतास रांगेत उभे राहावे लागते. महावितरणने तत्काळ नवीन केंद्र उघडावे अन्यथा आंदोलनाचा सामना करावा असा पवित्रा किनारपट्टी भागातील ग्राहकांनी घेतला आहे.
वीज देयकात छापील मुदतीत वीज देयके भरणा न कळल्यास ग्राहकांना अधिभार सोसावा लागतो. शिवाय महावितरणचे कर्मचारी गृहभेटी देऊन देयकं भरा अन्यथा पुरवठा खंडीत करण्या बाबत सूचित करतात. मात्र, किनारपट्टीतील डहाणूगाव, नरपड, आगर, मल्याण अशा भागात वीज भरणा केंद्र नसल्याने ग्राहकांना मसोली येथील महवितरणच्या कार्यालयात जावे लागते. तेथे ग्राहकांची लांबच लांब रंगा असल्याने अनेक तास वाया जातात. काही वेळा एक दोन वेळा हेलपाटे मारल्यावर नंबर लागतो. त्यामुळे शारीरिक व आर्थिक दोन्हीचे नुकसान सोसावे लागते असे ग्राहकांचे म्हणणे आहे.
या पुर्वी सुद्धा देयके सेतू कार्यालयात स्विकारली जायची, आता डहाणू जनता सहकारी बँकेच्या पूर्व शाखेत घेतली जातात. परंतु हे अंतर लांब असून दोन वेळा रिक्षा बदलावी लागत असल्याने ग्राहकांकरिता भुर्दंड पडत आहे.
- किनारपट्टी भागात वीज बील भरणा केंद्र सुरु करण्याची मागणी सहा महिन्यापूर्वी उप अभियंते धोडी यांची भेट घेऊन केली होती. मात्र, त्या बाबत अद्याप ठोस पाऊल उचलण्यात न आल्याची खंत व्यक्त होत आहे. दरम्यान महावितरणने ग्राहकांच्या हिताचा विचार न केल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा वीज ग्राहकांनी दिला आहे.