पुलावरील संरक्षक कठड्यांची उंची वाढवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2018 05:52 AM2018-12-21T05:52:41+5:302018-12-21T05:53:10+5:30
वाहनचालकांसह नागरिकांची मागणी : सततच्या दुरूस्तीने पुलावरील थर वाढला
वाडा : तालुक्यातील नद्यांवर असलेल्या जुन्या पुलांची उंची अंत्यत कमी झाल्याने अपघात होऊन काहींचा मृत्यू झाला आहे तर काही जण जखमी झाले आहेत. तसेच येथे मोठा अपघात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या पुलां वरील संरक्षक कठड्यांची उंची वाढवावी, अशी मागणी चालकांसह नागरिक करीत आहेत.
वाडा तालुक्यात तानसा, वैतरणा, पिंजाळ व देहर्जे अशा चार मुख्य नद्या असून येथून भिवंडी वाडा मनोर हा राज्यमार्ग गेला आहे. या नद्यांवर गेल्या अनेक वर्षापूर्वी पूल बांधलेले आहेत. या पुलांवर संरक्षक कठडे आहेत. मात्र सततच्या होणाऱ्या दुरुस्तीमुळे त्यांची उंची अत्यंत कमी असल्याने या पूलांवरून पडून अपघात झाले आहेत. गेल्या काही महिन्यापूर्वी या पुलांवरील कठड्यावरून पडून दुचाकी वरील एका तरूणाचा मृत्यू झाला होता. तर अनेक जण जखमी झाले आहेत. तसेच या पूलांवरून पडून मोठा अपघात होण्याची शक्यता आहे.
तानसा, वैतरणा, पिंजाळ या नद्यांवर गेल्या अनेक वर्षापूर्वी पुले बनवली आहेत. या पुलांवर संरक्षक कठडे आहेत.मात्र त्यांची उंची अत्यंत कमी असल्याने येथे अपघात होत आहेत. ते रोखण्यासाठी कठड्यांची उंची वाढवा.
- अनंता वनगा, आदिवासी मुक्ती मोर्चा सामाजिक संघटना
तानसा नदीवरील पुलाच्या कठड्यावरून पडून एका दुचाकीस्वाराला आपला जीव गमवावा लागला आहे. भविष्यात या पुलांवर मोठे अपघात होऊ शकतात. त्यामुळे संरक्षक कठड्यांची उंची वाढवावी अशी आमची मागणी आहे.
- सुरेश भोईर, अध्यक्ष, रिपाई (सेक्युलर), वाडा तालुका