भाताणे पुलाची उंची वाढवा!
By admin | Published: July 23, 2015 04:13 AM2015-07-23T04:13:01+5:302015-07-23T04:13:01+5:30
सालाबादप्रमाणे यंदाही भाताणे येथील तानसा नदीवरील पूल पाण्याखाली गेला. दरवर्षी मुसळधार वृष्टी झाली की, हा पूल पाण्याखाली जातो
वसई : सालाबादप्रमाणे यंदाही भाताणे येथील तानसा नदीवरील पूल पाण्याखाली गेला. दरवर्षी मुसळधार वृष्टी झाली की, हा पूल पाण्याखाली जातो व पंचक्रोशीतील सुमारे २० ते ३० गावांचा तालुक्याशी असलेला संपर्क तुटतो. यंदा खानिवडे, बेलवाडी या भागातही पुराचे पाणी शिरल्यामुळे या सर्व गावांतील ग्रामस्थांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागले. उसगाव-भाताणे व सायवन-मेढे हा संपूर्ण परिसर काल पाण्याखाली गेला होता. या पुलाची उंची वाढविण्यात यावी, याकरिता या परिसरातील ग्रामस्थ सतत मागणी करत असतात. परंतु, त्याकडे आजवर दुर्लक्ष करण्यात आले.
तानसा नदीच्या पात्रात प्रचंड रेतीउपसा होत असल्यामुळे ही नैसर्गिक आपत्ती दरवर्षी निर्माण होत असते, असा आरोप ग्रामस्थांकडून होत आहे. या नदीकाठी असलेला रस्ताही उद्ध्वस्त झाला आहे. अनेकदा त्याची दुरुस्ती केल्यानंतरही रस्त्याची अवस्था ‘जैसे थे’ अशीच असते. काल झालेल्या पावसामध्ये भाताणे, नवसई, थळ्याचापाडा व अन्य २० ते २२ गावांतील दैनंदिन व्यवहार ठप्प झाले होते. पुराचे पाणी शिरल्यामुळे या सर्व गावांतील शेती उद्ध्वस्त झाली आहे.
पूल बंद झाला की, ग्रामस्थ बेलवाडीमार्गे मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग तसेच सायवन-मेढे रस्त्याने वजे्रश्वरी-शिरसाड मुख्य रस्त्यावर येत असत. परंतु, यंदा चहूबाजूने पाणी शिरल्यामुळे ग्रामस्थांना बाहेर पडण्याचे सर्व रस्ते बंद झाले. काल पुरात अडकलेल्या ग्रामस्थांना आपत्ती निवारण पथकाने सुखरूप बाहेर काढले. दरवर्षी निर्माण होणाऱ्या या परिस्थितीवर उपाययोजना करण्यासाठी या पुलाची उंची वाढविणे गरजेचे आहे. परंतु, शासनाचा संबंधित विभाग या गंभीर समस्येकडे लक्ष देण्यास तयार नाही. मंगळवारी झालेल्या पावसानंतर पुराचा जोर इतका प्रचंड होता की, सकवार येथे एका महिलेचे घर पत्त्यासारखे कोसळले. सुदैवाने जीवितहानी झाली नाही. (प्रतिनिधी)