डिजेवर खर्च करण्यापेक्षा लोकसेवा आयोगाच्या परीक्षार्थींसाठी ग्रंथालय उभारा - डॉ. राठोड
By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2018 04:30 PM2018-09-02T16:30:34+5:302018-09-02T16:32:05+5:30
गणेशोत्सवात डिजेला परवानगी मिळणार नाही. डिजेमुळे वृद्ध, मुलं, रुग्ण आदिंना खूपच त्रास होतो. डिजेवर खर्च करण्यापेक्षा सर्वांनी त्या पैशातून लोकसेवा आयोगाच्या परीक्षार्थींसाठी ग्रंथालय शहरात सुरू करा, असं आवाहन ठाणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. शिवाजी राठोड यांनी गणेशोत्सव मंडळांसह लोकप्रतिनिधींना केले.
मीरारोड - गणेशोत्सवात डिजेला परवानगी मिळणार नाही. डिजेमुळे वृद्ध, मुलं, रुग्ण आदींना खूपच त्रास होतो. डिजेवर खर्च करण्यापेक्षा सर्वांनी त्या पैशातून लोकसेवा आयोगाच्या परीक्षार्थींसाठी ग्रंथालय शहरात सुरू करा, असं आवाहन ठाणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. शिवाजी राठोड यांनी गणेशोत्सव मंडळांसह लोकप्रतिनिधींना केले. सर्व पोलिसांनी सार्वजनिक गणेशोत्सवातील आरती व कार्यक्रमांमध्ये सहभागी होऊन लोकांशी संवाद साधा, अशी सूचना त्यांनी केली.
गणेशोत्सावाच्या अनुषंगाने मॅक्सस मॉल सभागृहात पोलिसांनी बैठकीचे आयोजन केले होते. बहुतेकांनी रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांबद्दल संताप व्यक्त केला. तर पालिकेची एकखिडकी योजना असूनही मंडळांना वाहतूक पोलीस, अग्निशमन दलाकडे फेऱ्या माराव्या लागतात, असे सांगितले.
महापौर डिंपल मेहता यांनी रस्त्यातील खड्डे बुजवण्याचे आदेश आपण पालिकेला दिल्याचे सांगितले. आयुक्त बालाजी खतगावकर यांनी खड्डे बुजवले जातील असे आश्वासन देतानाच विसजर्नावेळी खाद्य - पेयांच्या स्टॉलमुळे अस्वच्छता होऊ नये म्हणून सफाई कामगारांची नेमणूक करू असं सांगितले. सहाय्यक पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, उपअधीक्षक शांताराम वळवी, उपमहापौर चंद्रकांत वैती, पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोराटे, जगदिश शिंदे, बालाजी पांढरे, राम भालसिंग, वैभव शिंगारे, प्रविण साळुंके सह नगरसेवक, संस्थांचे पदाधिकारी - कार्यकर्ते उपस्थित होते.
गुलालमुळे कर्करोगसारखे आजार होत असल्याने फुलांच्या पाखळ्या वापरा. उंच मूर्ती टाळा, धार्मिक वाद होणार नाही याची काळजी घ्या. मूर्तीचे पावित्र्य ठेवा. सकारात्मक व सामाजिक बांधिलकीचे संदेश देखाव्यातून द्या असं मार्गदर्शन करतानाच नाहक वाद निर्माण होईल असं काही केल्यास तो एक दिवस तुमचा असेल पण नंतरचे सर्व दिवस आमचे असतील, अशी तंबीसुद्धा त्यांनी दिली. पोलीस कारवाई करतील आणि मग येणारे प्रत्येक सण पोलीस ठाण्यात हजेरी लावण्यात जातील. जुगार खेळाल तर धाडी टाकणार असं राठोड यांनी सांगितले.