अग्निशमन केंद्रात मनुष्यबळ वाढवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2017 01:56 AM2017-09-02T01:56:35+5:302017-09-02T01:56:46+5:30
मीरा-भार्इंदर महापालिकेच्या उत्तन येथील अग्निशमन केंद्रात पुरेसे मनुष्यबळ तसेच वाहनांची संख्या अपुरी असल्याने येथील वाढत्या लोकवस्तीच्या प्रमाणात ते तोकडे पडत आहे. त्यामुळे प्रशासनाने त्वरित येथील केंद्रात पुरेशा मनुष्यबळासह वाहने उपलब्ध करुन द्यावीत
भार्इंदर : मीरा-भार्इंदर महापालिकेच्या उत्तन येथील अग्निशमन केंद्रात पुरेसे मनुष्यबळ तसेच वाहनांची संख्या अपुरी असल्याने येथील वाढत्या लोकवस्तीच्या प्रमाणात ते तोकडे पडत आहे. त्यामुळे प्रशासनाने त्वरित येथील केंद्रात पुरेशा मनुष्यबळासह वाहने उपलब्ध करुन द्यावीत, अशी मागणी शिवसेनेच्या नगरसेविका शर्मिला बगाजी यांनी पालिकेकडे केली आहे.
पालिकेची भार्इंदर पश्चिमेकडील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग व सिल्वर पार्क येथे प्रमुख अग्निशमन केंद्रे आहेत. याखेरीज उत्तन येथील पाण्याच्या टाकीजवळील एका खोलीत तसेच नवघर येथे एका पत्र्याच्या शेडमध्ये पर्यायी अग्निशमन केंद्र सुरू करण्यात आली आहेत. अग्निशमन दलात एकूण ९ मोठे व २ मिनी फायर व वॉटर टेंडर अशा एकूण ११ बंबगाड्या, १ रेस्क्यु व्हॅन, २ वॉटर टँकर, १ टिटीएल (टेबल टर्न लॅडर), १ रूग्णवाहिका तैनात ठेवल्या आहेत. ते हाताळण्यासाठी एकूण ८२ अधिकारी व कर्मचारी तीन पाळ्यांत काम करतात.
उत्तनच्या अग्निशमन केंद्रात प्रत्येक पाळीत १ लिडींग फायरमन, २ फायरमन, १ फायरमन कम ड्रायव्हर, १ कंत्राटी ड्रायव्हर असे एकूण ६ अधिकारी व कर्मचारी असतात. या केंद्रासाठी पूर्वी एक मिनी फायर व वॉटर टेंडर वाहन दिमतीला दिले जात होते. सध्या १ मोठे वाहन दिले आहे. या केंद्राजवळच घनकचरा प्रकल्प असून अनेकदा आगीच्या घटना घडतात.