वसई विरार महापालिकेसाठी लसीचा पुरवठा वाढवा; आमदार हितेंद्र ठाकूर यांचे मुख्यमंत्र्यांना साकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2021 12:42 PM2021-05-06T12:42:57+5:302021-05-06T12:43:37+5:30
कोविड-19 प्रतिबंधात्मक उपाय म्हणून सर्वतोपरी प्रयत्न केले जात असून कोविड-19 नियंत्रणासाठी लसीकरण मोहिम प्रभावीपणे राबविण्याची गरज आहे
- आशिष राणे
वसई :वसई-विरार शहर महानगरपलिकेच्या कार्यक्षेत्रामध्ये शासनाने दिलेल्या सुधारित मार्गदर्शक सूचनांनुसार कीविड-19 प्रतिबंधक लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. वसई-विरार महानगरपालिका कार्यक्षेत्रातील लोकसंख्या सुमारे 23 लाख इतकी असून कोविड-19 ने बाधीत रुग्णांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे.
कोविड-19 प्रतिबंधात्मक उपाय म्हणून सर्वतोपरी प्रयत्न केले जात असून कोविड-19 नियंत्रणासाठी लसीकरण मोहिम प्रभावीपणे राबविण्याची गरज आहे आणि त्यासाठी जास्त संख्येने लस पुरवठा करण्याची मागणी वसईचे आमदार हितेंद्र ठाकूर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे केली आहे.
आम.हितेंद्र ठाकूर यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे कि,आतापर्यंत कोव्हिशिल्ड लसीचे 98 हजार 192 डोस व कोवॅक्सीन लसीचे 4 हजार 800 डोस असे दोन्ही मिळून एकूण लसीचे 1लाख 2 हजार 992 डोस वसई-विरार शहर महापालिकेच्या वैदयकिय आरोग्य विभागाला प्राप्त झाले आणि त्याप्रमाणे 1लाख 2 हजार 992 इतक्या लाभार्थ्यांना लस देण्यात आली आहे.
यात प्रथम डोसचे लाभार्थी 84287 इतके असून दुस-या डोसचे लाभार्थी 18705 इतके आहेत. वसई विरार शहराची लोकसंख्या लक्षात घेता लाखो नागरिक आजही लसीकरणापासून वंचित आहेत. अपु-या लस पुरवठयामुळे लसीकरण करून घेण्यासाठी नागरिक महानगरपालिकेने स्थापित केलेल्या लसीकरण केंद्रांवर मोठ्या प्रमाणात गर्दी करीत आहेत. तर काही नागरिक नजीकच्या मिरा-भाईंदर महानगरपालिकेत मुबलक लस पुरवठा असल्याने तेथे जाऊन अपले लसीकरण करून घेत आहेत.
दरम्यान शहरांतील जास्त लोकसंख्या लक्षात घेता किमान 10 लाख डोसेस मिळाले तर 25 लाख लोकसंख्येचे कोविड 19 पासून नियंत्रण करता येईल. पालघर जिल्हयाला होणा-या लस पुरवठया पैकी 50 टक्के लस ही वसई विरार शहर महानगरपालिकेस मिळावी जेणे करून कोविड 19 प्रादुर्भावाला आळा घालता येईल अशी मागणी आम.हितेंद्र ठाकूर यांनी आपल्या पत्रात केली आहे.
तसेच वय वर्षे 18 ते 44 पर्यंतचे लसीकरण ऑनलाईन रजिस्ट्रेशन करतेवेळी वेळ कमी असल्याने रजिस्ट्रेशन करताना अनेक अडचणी येत असून नोंद केलेल्या नागरिकांना देखील लस मिळत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.तरी कृपया वसई विरार शहर महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रासाठी पहिल्या टप्यात किमान 10 लाख लसीकरण डोस मंजूर करून ते पालिकेला द्यावेत अशी मागणी पत्राद्वारे आम.हितेंद्र ठाकूर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे,उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याकडे केली आहे.
ऑक्सिजन पुरवठ्यात वाढ करण्याची माजी महापौर प्रवीण शेट्टी यांची मागणी
पालघर जिल्ह्याची लोकसंख्या जवळपास 30 लाखाच्या मध्ये असून त्यातील 22 ते 25 लाख लोकसंख्या हि वसई विरारच्या असून याठिकाणी मोठ्या प्रमाणावर कोरोना रुग्नांची संख्या वाढत आहे सद्याच्या घडीला 25 मॅट्रिक टन ऑक्सिजनची गरज वसई विरारला असताना याठिकाणी फक्त 16 ते 17 टन ऑक्सिजन मिळत असल्याने येथील रुग्णांना त्याचा फटका बसत आहे. तरी ऑक्सिजन पुरवठ्यात वाढ करावी अशी मागणी प्रवीण शेट्टी यांनी मुख्यमंत्री आणि आरोग्य यांच्याकडे केली आहे.