निर्मळ तीर्थक्षेत्र परिसरात अनधिकृत बांधकामांत वाढ
By admin | Published: October 24, 2015 12:26 AM2015-10-24T00:26:21+5:302015-10-24T00:26:21+5:30
ऐतिहासिक निर्मळ तलावाच्या अवतीभोवती प्रचंड प्रमाणात अनधिकृत बांधकामे उभी राहिली आहेत. या बांधकामांमुळे तलावाचे क्षेत्र हळूहळू कमी होत चालले आहे. ही बांधकामे
वसई : ऐतिहासिक निर्मळ तलावाच्या अवतीभोवती प्रचंड प्रमाणात अनधिकृत बांधकामे उभी राहिली आहेत. या बांधकामांमुळे तलावाचे क्षेत्र हळूहळू कमी होत चालले आहे. ही बांधकामे करणाऱ्या व्यावसायिकांचा तहसील कार्यालयात राबता असल्यामुळे यापूर्वी त्यांच्यावर कोणतीही कारवाई झाली नाही. सध्या हा संपूर्ण परिसर महानगरपालिका क्षेत्रात येत असून अनधिकृत बांधकामविरोधी विभागानेही याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे.
वसई तालुक्यातील निर्मळ परिसरात आद्य जगद्गुरू शंकराचार्यांचे समाधी मंदिर आहे. तेथेच विमल व मलई असे २ तलाव आहेत. या संपूर्ण परिसराला ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. मात्र, येथील अनधिकृत बांधकामांमुळे तलावाचे पावित्र्य नष्ट होत असून या परिसराला आता डम्पिंग ग्राउंडचे स्वरूप आले आहे. सध्या या तलावाभोवती महानगरपालिका सुशोभीकरण करीत आहे. मात्र, हे काम सुरू असताना येथील अनधिकृत बांधकामांकडे मात्र अधिकारीवर्ग जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे. येथे अनधिकृत बांधकामे उभारून तीर्थक्षेत्राचे पावित्र्य नष्ट करणाऱ्या समाजकंटकांवर एमआरटीपी कायद्यांतर्गत कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.