लॉकडाऊन काळात वाढल्या वाहनचोरीच्या घटना; वसईत ७ महिन्यांत तब्बल २१५ वाहने चोरीला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2020 11:57 PM2020-09-08T23:57:05+5:302020-09-08T23:57:18+5:30
पोलिसांपुढे गुन्हे उघड करण्याचे मोठे आव्हान
- मंगेश कराळे
नालासोपारा : वसई तालुक्यात घरफोडी, चोरी, मारामारी, सोनसाखळी चोरी, दुचाकीचोरी आणि आॅनलाईन फसवणूक यासारखे गुन्हे नेहमी घडत आहे, मात्र वसई-विरार शहरात सध्या वाहनचोरांनी धुमाकूळ घातला असून शहराच्या प्रत्येक पोलीस ठाण्याच्या हद्दीत दुचाकी आणि चारचाकी वाहने चोरीला जाऊ लागली आहेत. या वर्षातील पहिल्या सात महिन्यात तब्बल २१५ वाहने चोरीला गेली आहेत. म्हणजे दिवसाला सरासरी एक वाहन चोरीला जात आहे. विशेष म्हणजे यातील चाळीस वाहने ही टाळेबंदीच्या काळात चोरीला गेली आहेत. या वाहनचोरांच्या वाढत्या घटनांमुळे पोलिसांपुढे मोठे आव्हान निर्माण झाले आहे.
कोरोनामुळे आर्थिक चक्र बिघडले आणि लोकांचे रोजगार बुडाले. मोठ्या प्रमाणात बेरोजगारी वाढली आहे. यामुळे चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. वसई-विरार शहरात घरफोड्या, भुरट्या चोºया, सोनसाखळी चोºया, मोबाईल चोºया, फसवणूक, रस्त्यात अडवून लुटणे आदी प्रकार वाढू लागले आहेत. या सर्वांमध्ये वाहनचोरीही प्रामुख्याने वाढली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार १ जानेवारी ते ३१ जुलै या सात महिन्यात २१५ वाहने चोरीला गेली आहेत. त्यात दुचाकी, चारचाकी, रिक्षा तसेच जीप आणि मालवाहतूक करणाºया वाहनांचाही समावेश आहे. सध्या वाहनचोरी करणारी टोळी शहरात सक्रि य झाली आहे. वाहनचोरी रात्रीच नव्हे, तर दिवसाढवळ्याही होत आहे. घरासमोर, इमारतीखाली पार्क केलेली वाहने चोरीला जात आहेत.
रस्त्याच्या कडेला असलेली वाहने राजरोसपणे लंपास केली जात आहेत. कोरोना काळात पोलिसांचे झालेले दुर्लक्ष, गस्तीचा अभाव, नागरिकांची कमी झालेली वर्दळ याचा गैरफायदा घेत ही वाहनचोरी होत आहे.
मागील वर्षात २८० वाहन चोरीच्या घटनांची नोंद झाली होती, मात्र या वर्षी केवळ सात महिन्यात २१५ वाहनचोरीच्या घटना घडल्या आहेत. वाहनचोरी करणारे चोरटे दिवसा रेकी करतात. त्यामुळे आपली वाहने शक्यतो अनोळखी ठिकाणी पार्क करू नयेत. वाहने पार्क करताना सुरक्षेसाठी लॉक करणे आवश्यक आहे. इमारतीच्या परिसरात सीसीटीव्ही लावणे आवश्यक आहे. ज्या ठिकाणी सीसीटीव्ही नाही, अशा ठिकाणची वाहने मोठ्या प्रमाणात चोरीला जात असल्याचे पोलिसांनी सांगितले.
नागरिकांमध्ये संताप
वाहनचोरांना पकडणे हे पोलिसांपुढे मोठे आव्हान निर्माण झाले आहे. मागील वर्षी वाहन चोरीच्या २८० घटना घडल्या होत्या. त्यापैकी केवळ ३१ प्रकरणे उघडकीस आली होती. त्यामुळे वाहनचोर पोलिसांपेक्षा एक पाऊल पुढे असल्याचे सिद्ध झाले आहे. पोलिसांना या वाहनचोरांना पकडण्यात यश येत नसल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे.