ग्रामीण भागामध्ये कोरोनाचा वाढला धोका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2021 11:26 PM2021-04-22T23:26:38+5:302021-04-22T23:49:15+5:30
जिल्ह्यात आजवर १,४०३ रुग्णांचा मृत्यू, वसई-विरारमध्ये सर्वाधिक बळी, रुग्णांसह नातेवाईक त्रस्त
जगदीश भोवड
लोकमत न्यूज नेटवर्क
पालघर : जिल्ह्यामध्ये कोरोनाचा हाहाकार सुरूच असून, पहिल्या लाटेपेक्षा दुसरी लाट जिल्ह्यासाठी विशेषतः ग्रामीण भागासाठी घातक ठरली आहे. पहिल्या लाटेत पालघरच्या ग्रामीण आदिवासी भागात फारसे नुकसान झाले नव्हते, मात्र आता जिल्ह्यातील अनेक गावातही रुग्ण आढळत असल्याने चिंता व्यक्त होत आहे. दरम्यान, गेल्या वर्षभरात जिल्ह्यात तब्बल १ हजार ४०३ जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे.
जिल्ह्यात एकमेव महानगरपालिका असलेल्या वसई-विरारमध्ये सुरुवाती-पासून कोरोनाचे रुग्ण मोठ्या संख्येने आढळत होते. त्याला कारण म्हणजे हे शहर मुंबई तसेच ठाणे या भागांना जोडलेले असून नोकरी तसेच उद्योग-व्यवसायासाठी मुंबई-ठाण्यात अनेक लोक जात असल्याने या भागात मोठ्या प्रमाणात संसर्ग वाढला आहे. तसेच पालिका हद्दीतील नागरिकांची बेफिकिरीही तेवढीच कारणीभूत ठरली आहे. अन्य भागांपेक्षा वसई-विरार परिसरात मोठ्या संख्येने रुग्ण आढळले असून अद्यापही त्यात दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. वसई-विरार परिसरातील रुग्णांची संख्याही आता ४७ हजार ४३४ वर पोहोचली असून कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांची संख्या ९९९ झालेली आहे.
वसईनंतर पालघर तालुक्यात जास्त रुग्ण आढळले आहेत. तेथील एकूण रुग्णांची संख्या १४ हजार २७ झाली असून १८५ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. यानंतर डहाणूमध्ये ३ हजार ४८३ रुग्ण आढळले असून ४७ जणांचा प्राण गेला आहे. जव्हारमध्ये २ हजार ७१४ रुग्ण आढळलेले असून २८ जण मृत्युमुखी पडले आहेत. वाडा तालुक्यामध्ये २ हजार ३२६ जण बाधित झालेले असून ६० जण मृत्यू पावले आहेत. वसई ग्रामीण परिसरात १ हजार ६३० रुग्ण आढळलेले असून ५० जण दगावले आहेत. मोखाडा तालुक्यात ६१७ रुग्ण आढळलेले असून १४ जणांचा मृत्यू झाला आहे. विक्रमगड तालुक्यात ८७१ रुग्ण आढळले असून १३ जणांनी आपले प्राण गमावले आहेत. तलासरी तालुक्यात ६९१ जण बाधित ठरले असून ७ जणांचा मृत्यू झालेला आहे.
आरोग्य यंत्रणेवर वाढला ताण
पालघर जिल्ह्यातील जव्हार, मोखाडा, विक्रमगड हे तालुके आदिवासीबहुल असून या भागांतही आता मोठ्या संख्येने रुग्ण आढळू लागल्याने आणि कोविड रुग्णालये तसेच कोविड केअर सेंटरमध्ये रुग्णांना खाटा मिळत नसल्याच्या तक्रारी वाढू लागल्या असून आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण आलेला आहे.
ऑक्सिजनसाठी करावी लागतेय धावपळ
पालघर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात विक्रमगड, वाडा, बोईसर, वसई-विरारसह अनेक भागात कोविड केअर सेंटर आणि कोविड रुग्णालये निर्माण करण्यात आलेली आहेत. जवळपास सर्वच रुग्णालये हाऊसफुल्ल झालेली असून अनेक रुग्णांना ऑक्सिजनची आवश्यकता भासत आहे. त्यातच नालासोपारा येथे अलीकडेच ऑक्सिजनअभावी रुग्णांचा मृत्यू झाल्याच्या घटना घडल्याचा आरोप नातेवाइकांनी केला होता. यामुळे सध्या रुग्णांच्या नातेवाइकांची ऑक्सिजनसाठी धावपळ सुरू असल्याचे दिसून येते.
जिल्ह्यात सध्या ऑक्सिजनचा पुरवठा समाधानकारक आहे. बोईसर, कुडूस, नालासोपारा भागातून ऑक्सिजन आणला जात असून मागणीनुसार पुरवठा केला जात आहे.
- डॉ. राजेंद्र केळकर, प्रभारी जिल्हा शल्यचिकित्सक, पालघर